टायर ट्यूबमधून हातभट्टीची वाहतूक; ऑटाेसह पथकाने दोघाला पकडले

in #yavtmal2 years ago

हातभट्टी दारुची चाेरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या दोघाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने वाहनासह पकडले असून, त्यांच्याकडून तब्बल ९०० लिटर हातभट्टीसह वाहन असा एकूण २ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई लातूर शहरातील नांदेड राेडवर गरुड चाैकात शुक्रवारी करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड येथील विभागीय उपायुक्त उषा वर्मा यांच्या आदेशानुसार लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या पथकाला माहिती मिळली. या माहितीच्या आधारे लातुरातील नांदेड राेडवरील गरुड चाैकात शुक्रवारी सापळा लावण्यात आला. यावेळी एक ऑटाे येत असताना पथकाने ऑटाेला थांबवून झाडाझडती घेतली. त्यात पाच ट्यूबमधून हातभट्टी दारुची चाेरट्या मार्गाने वाहतूक करताना आढळून आले. अधिक चाैकशी केली असता या ट्यूबमध्ये तब्बल ९०० लिटर दारु असल्याचे हाती लागले. यावेळी ऑटाेसह दोघाला ताब्यात घेण्यात आले. हातभट्टी दारु आणि ऑटाे असा एकूण २ लाख ९५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई निरीक्षक आर. एम. बांगर, निरीक्षक आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एस.बी. माटेकर, अमाेल शिंदे, स्वप्नील काळे, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, जवान अनिरुद्ध देशपांडे, हणमंत मुंडे, संताेष केंद्रे यांच्या पथकाने केली आहे.