सत्तर फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान, रेस्क्यू टीमची तीन तास मोहीम

in #yavtmal2 years ago

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथे सत्तर फूट विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाच्या वन्यप्राणी रेस्क्यू टीमने ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढून जीवदान दिले. अखेर तीन तास केलेले अथक् प्रयत्न फळाला आले.आर्वी येथील धनाजी जाधव यांच्या शेतात सोनार वस्तीजवळ विहीर आहे. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धनाजी जाधव विहिरीवर गेले असता, त्यांना विहिरीमधील सिमेंटच्या जईवर कोल्हा बसलेला दिसला. विहीर सत्तर फूट खोल आणि पायऱ्या असल्यामुळे कोल्ह्याला वाचवायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला. काही वेळानंतर ही माहिती गावात पसरली आणि सायंकाळी रहिमतपूरचे वनपाल अनिल देशमुख यांना विहिरीत कोल्हा पडल्याची माहिती गावातील एकाने दूरध्वनीवरून दिली. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती कोरेगावचे वनक्षेत्रपाल घार्गे यांना दिली.त्यानंतर काही वेळातच वनपाल अनिल देशमुख, वनरक्षक संतोष काळे यांच्याबरोबरच कोरेगाव येथील वन्यप्राणी रेस्क्यू टीममधील वनरक्षक संतोष लोखंडे, विजय नरळे, अमर जाधव घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी रात्र झाल्यामुळे विहिरीतील कोल्ह्याला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. या अडचणीच्या काळात आर्वीतील कुमार मदने व संतोष बंडलकर या धाडसी युवकांनी वन्यप्राणी रेस्क्यू टीममधील सदस्यांबरोबर वाघरीच्या साहाय्याने विहिरीतून कोल्ह्याला बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली. तब्बल तीन तासाच्या अथक् प्रयत्नानंतर कोल्ह्याला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात आले व तातडीने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

विहिरीतील सिमेंटच्या गोल राऊंड असलेल्या जईच्यावरती पाणी पातळी असावी. त्या पाण्यात कोल्हा पडला असावा. मात्र शेतकऱ्याने विहिरीवरील मोटर सुरू केल्यानंतर दुपारपर्यंत पाणी पातळी जसजशी खाली जाईल, तसा कोल्हा आधारासाठी जईवर जाऊन बसला असावा, अशी शक्यता वनपाल अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे.