पैशांचा पाऊस पाडतो म्हणत चक्क ११ लाख उकळले!

in #yavatmal2 years ago

औरंगाबाद - दामदुप्पट पैशांचा पाऊस पाडतो म्हणत एक-दोन वेळा अंधारात पैशांचा खोटानाटा पाऊसही पाडला. मग विश्वास बसल्यानंतर एक -दोन नव्हे तर तब्बल ११ लाख ६२ हजार रुपये उकळले, मात्र तेवढ्यातही समाधान झाले नाही, त्यामुळे पूजेचे साहित्य घेऊन या म्हणत हॉटेलमध्ये थांबलेल्या संशयितांविषयी शंका आल्याने, तसेच पैशांचा पाऊसही न पडल्याने तिघा श्रीमंत असणाऱ्या फिर्यादींनी गुन्हे शाखा पोलिसांत धाव घेतली अन् संशयित हॉटेलात थांबल्याचे सांगितले. दरम्यान १४ जुलैच्या मध्यरात्री गुन्हे शाखेने तिघांना बेड्या ठोकल्या, तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला.

हा प्रकार १५ जून रोजीपासून घडत होता.कैलास रामदास साळुंके (२५, रा. वाळूज), प्रमोद दीपक कांबळे (३१, रा. बौद्धनगर, जवाहर कॉलनी), गोरख साहेबराव पवार (२३, रा. शिर्डी, जि. नगर) अशी त्या आरोपींची नावे असून रवींद्र हुंडे (५०, रा. लालमाती, भावसिंगपुरा) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पडेगाव परिसरातील जावेद खान नूर खान (५०, रा. प्रिया कॉलनी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक रस्त्यावर असलेला ढाबा त्यांनी २००६ मध्ये बंद केला आहे. सध्या ते प्लॉटिंग व्यवसाय करतात. खान यांची ढाब्यावर ग्राहक म्हणून आलेल्या गोव्यातील पुष्पा ऊर्फ रत्नदीप गाडेकर (वय ७०) यांची ओळख झाली होती. पुष्पा यांना खान यांनी बहीण मानले आहे. त्या अधूनमधून खान यांना भेटण्यासाठी पडेगावला येतात. १५ जून रोजी पुष्पा या खान यांच्याकडे आल्या असताना खान यांच्या घरी आलेला संशयित प्रमोद कांबळे याच्यासोबत पुष्पा यांची ओळख झाली होती. दरम्यान खान, पुष्पा आणि महेश ऊर्फ शोधन प्रसाद निपाणीकर (रा.साईनगर, मापसा, गोवा) यांना कांबळेने आपल्या ओळखीचा एक मांत्रिक असून तो पैशांचा पाऊस पाडून रक्कम दुप्पट करतो असे सांगितले.

बोकड आणण्यापासून पैसे उकळण्यास केली सुरवात

ओळखीच्या मांत्रिकाची भेट करून देण्यासाठी कांबळेने गाडेकर यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर १६ जून रोजी कांबळेने त्याचा ओळखीच्या कैलास साळुंकेची मांत्रिक म्हणून ओळख करून दिली आणि बोकडासाठी पुन्हा सात हजार रुपये घेतले. १७ जून रोजी वाळूजला पैशांचा पाऊस पाडून दाखवतो म्हणत खान यांच्याकडून दोन लाख, पुष्पा यांच्याकडून ५ लाख ९० हजार रुपये वेळोवेळी कांबळेचा भाचा सूरज जाधवच्या फोन पे वर आणि रोखीने तीन लाख रुपये, त्याशिवाय निपाणीकर यांच्याकडून तीन लाख ६० हजार असे सर्वांचे मिळून ११ लाख ६० हजार रुपये घेतले.

म्हणून बसला होता विश्वास

विशेष म्हणजे चौघा आरोपींनी फिर्यादींना वाळूजपासून काही अंतरावर लांझी रस्त्याने घेऊन गेले, तिथून शेकटा, ता. पैठण येथे जाऊन आरोपीच्या एका नातेवाइकाच्या घराशेजारी घेऊन गेले. तिथे पूजा मांडून पैशांच्या बंडलच्या गोण्या होत्या. त्या अंधारात बॅटरीने दाखवून दिल्याने फिर्यादींचा विश्वास बसला होता.

आरोपी मांत्रिक कैलास साळुंके याने तिघा फिर्यादींना ३० जून रोजी त्याच्या बहिणीच्या घरी शिर्डी येथे घेऊन गेले. त्याचा मेहुणा आरोपी गोरख पवार याने त्यांच्या घराच्या बाजूला जाऊन पूजा मांडली. पूजेत फिर्यादींसमोर अंधारात पैशांचा खोटानाटा पाऊस पाडला. त्यानंतर काही दिवसांतच १४ जुलै रोजी तुम्ही आजवर दिलेल्या पैशांचे दामदुप्पट पैसे देतो म्हणत सर्वजण औरंगाबादेत या असे सांगून पूजेसाठी ९० हजार रुपये मागितले.

दरम्यान आजवर केवळ पैसे उकळले, मात्र पाऊस पाडलाच नाही, त्यामुळे फिर्यादींना शंका आल्याने त्यांनी पोलिसांना कळविले. त्यावेळी आरोपी कार्तिकी हॉटेलात थांबले होते. त्यांन उपायुक्त अपर्णा गीते, सहायक आयुक्त विशाल ढुमे, गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल म्हस्के, सतीश जाधव, जितेंद्र ठाकूर, राजेंद्र गुजराती, संजय राजपूत, मच्छिंद्र जाधव, मनीष सूर्यवंशी, नवनाथ खांडेकर, विठ्ठल सुरे, ज्ञानेश्वर पवार यांनी पकडले.

पुढील तपास क्रांती चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक छोटूराम ठुबे करत आहेत. तिघा आरोपींना १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे तपास अधिकारी ठुबे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Sort:  

Good job