Shivsena: रश्मी ठाकरेंनी आरती केली 'त्या' टेंभी नाक्याचं राजकीय महत्व काय?

in #nagpur2 years ago

bhushan_esakal___2022_09_29T175916_555.png
ठाणे : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात संघर्ष सुरू झाला. मागील काही दिवसांपासून गटांमध्ये वारंवार खटके उडत आहेत. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या ठाण्यातील टेंभीनाक्य्यावरील दुर्गेश्वरी देवीचे दर्शन घेत आरती केली. या दरम्यान टेंभिनाक्यावरील देवीच्या मंदीराचे नेमके राजकीय महत्व काय हे आपण जाणून घेणेही महत्वाचे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यात रश्मी ठाकरे यांचं ठाकरे समर्थकांनी जोरदार स्वागत केलं. त्यामुळे शिंदेच्या ठाण्यात एकप्रकारे हे शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन असल्याचे बोलले जात आहे. रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात दाखल होताच प्रथम आनंद आश्रम इथल्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याचं दर्शन देखील घेतलं.दरम्यान मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर ठाण्याच्या टेंभी नाका येथील देवीचे मंदीर यंदा जास्तच चर्चेत आहे. ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व दोन्ही समजून घेणे महत्वाचे आहे.
आनंद दिघेंनी केली होती स्थापना..शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी 1978 साली ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी या नवरात्र उत्साहाला सुरुवात केली. सांगितले जाते की, आनंद दिघे यांना साक्षात्कार झाल्यानंतर ही मूर्ती बनवण्यात आली. दरवर्षी येथे होणार नवरात्रोत्सव हा ठाणे शहर तसेच संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाला. आनंद दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे. मंदीरात दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येतात.शिवसेनेचे नेते दरवर्षी नवरात्रीत ठाण्यातील या देवीचे दर्शन घेत असत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिंदे गट वेगळा झाला. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गटात अनेक प्रसंगी वाद निर्णाण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथे आनंद दिघे यांच्यानंतर या उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.
दरम्यान आनंद दिघे यांचा वारसा सांगणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील या प्रसिद्ध मंदीरात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे येणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार असे बोलले जात होते. यादरम्यान आज रश्मी ठाकरे यांनी टेंभी नाक्यावरील देवीच्या मंदीरात आरती केली. संध्याकाळच्या आरतीचा मान शिंदे गटाच्या महिला आघाडीला देण्यात आला होता. तसेच शिंदे गटाकडून रश्मी ठाकरे यांना आम्ही सन्मानाने वागणूक देऊ असे सांगण्यात आले होते.