मोठी बातमी: क्रिकेटजगतात पुन्हा फिक्सिंगचे भूत? पाकिस्तानचा ‘तो’ सामना होता फिक्स

यावर्षी जुलै महिन्यात पाकिस्तान संघाने श्रीलंकेचा दौरा केला होता. या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेलेली. मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने विजय मिळवलेला. पहिल्या डावात श्रीलंका 222 तर पाकिस्तान ‌‌‌‌‌‌‌संघ 218 धावांवर सर्वबाद झालेला.‌ त्यानंतर श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावात 337 धावा फटकावल्या. पाकिस्तानने युवा अब्दुल्ला शफीक याच्या दीडशतकाच्या जोरावर 342 धावांचे लक्ष पूर्ण केले. त्यामुळे आता हा सामना श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या नजरेत भरला आहे. या सामन्यात फिक्सिंग झाल्याची शक्यता वर्तवली असून, श्रीलंका क्रिकेट बोर्ड याची चौकशी करेल.‌

श्रीलंकेतील खासदार नलीन बंडारा यांनी या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी या प्रकरणी आरोप केल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आपल्या भ्रष्टाचार विरोधी पथकाला चौकशीचे आदेश दिले आहेत. बंडारा यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले,

“श्रीलंका क्रिकेटमधील जवळपास प्रत्येक व्यक्ती भ्रष्टाचारात गुंतला आहे. त्यामुळे या सामन्यात नक्कीच काहीतरी गैर झाले आहे असे आम्हाला वाटते.”

माध्यमांतील वृत्तानुसार, बंडारा यांनी याप्रकरणी अद्याप कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. केवळ संशयाच्या आधारे त्यांनी हे प्रकरण उभे केले आहे. या मालिकेतील दुसरा सामना श्रीलंकेने जिंकून मालिका बरोबरीत सोडवली होती. याच मालिकेदरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी दुखापतग्रस्त झालेला.SLvsPAK.jpg