दिल-दोस्ती : मैत्रीचा धागा पक्का...!

in #hingoli2 years ago


पांडुरंग जाधवकामाच्या निमित्तानं भेटलेली माणसं अनेकदा आपल्या कुटुंबाचाच भाग होऊन जातात. अशाच दोन व्यक्ती म्हणजे अभिनेता प्रणव रावराणे आणि दिग्दर्शक पांडुरंग जाधव. त्यांची पहिली भेट चार-पाच वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर स्क्रिप्टच्या निमित्ताने त्यांच्या वरचेवर भेटी होत राहिल्या. या भेटींमुळे त्यांच्यातलं ट्युनिंग खूप छान जमलं आणि ते एकमेकांचे चांगले मित्र झाले.प्रणव म्हणाला, ‘‘पांडुरंग सरांचा स्वभाव खूप छान आहे. ते नेहमीच खूप शांतपणे समोरच्याचं म्हणणं ऐकून घेतात. त्यासोबतच एखादा कठीण प्रसंग आला तर त्यात खचून न जाता आता यातून कसा मार्ग काढायचा याचा ते विचार करतात. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. ‘गैरी’ चित्रपट बनवताना त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. त्यांचा सगळा प्रवास मी खूप जवळून पाहिला आहे आणि त्यामुळं मला त्यांचा अधिक आदर वाटतो. ते शिक्षकही आहेत. प्रत्येक शिक्षक त्याच्या विद्यार्थ्यांना विद्या देत असतो. परंतु पांडुरंगसर असे शिक्षक आहेत, जे त्यांच्या विद्यार्थ्यांना समजूनही घेतात आणि वेळप्रसंगी थोडं कठोरही होतात. चित्रपट दिग्दर्शक म्हणून ‘गैरी’ त्यांचा पहिला चित्रपट आहे, जो त्यांनी त्यांच्या परीने चांगला बनवला आहे. परंतु मला वाटतं की त्यांच्यातला लेखक अधिक उत्तम आहे. त्यांचा पेशन्स आणि कठीण प्रसंगातून अगदी हसत खेळत मार्ग काढण्याचा त्यांचा स्वभाव मला आत्मसात करायला आवडेल.’’