महाराष्ट्राच्या 'खली'साठी रात्रीत जमा झाली एवढी रक्कम, वसंत मोरेंनी मानले चाहत्यांचे आभार

in #yavtmal2 years ago

दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचे अंगरक्षक उमेश आसवे यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया होत आहे. त्यातच, वांजळेंच्या मृत्यूनंतर उमेश यांची आर्थिक परिस्थिती ढासाळली. महाराष्ट्राचे खली म्हणून त्यांना संबोधले जाते. मात्र, या खलीच्या प्रकृती अस्वस्थतेसाठी आता आर्थिक मदत मागण्यात येत आहे. नगरसेवक वसंत मोरे यांनी फेबुक पोस्ट करुन अनेकांना मदतीचा हात मागितला होता. त्यांच्या या आवाहनला नेटीझन्स आणि चाहत्यांनी मदत केली. त्यातून उमेश यांच्यावरील उपचारासाठी मोठी रक्कम जमा झाल्याचं मोरे यांनी सांगितलं.

वसंत मोरे हे नाव गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियात आणि मीडियात चांगलंच चर्चेत आहे. आपल्या हटके स्टाईल कामाने ते सोशल मीडियावर हिरो ठरले आहेत. आक्रमक पण तितकाच संवेदनशील नेता अशीही त्यांची ओळख आहे. त्यामुळेच, आपल्या नेत्याच्या अंगरक्षकावर आलेल्या संकटासाठी ते संकटमोचक म्हणून धावून आले आहेत. रमेश वांजळे यांचे बॉडीगार्ड असलेल्या उमेश यांच्यासाठी त्यांनी आर्थिक मदतीची याचना केली होती, त्यास चाहत्यांनी मोठा प्रतिसाद दिला.

उमेशच्या आजारासाठी लागणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त म्हणजे 5 लाख रुपये एक रात्रीत जमा झाले. माझ्या आवाहनला प्रतिसाद देत चाहत्यांनी 500 रुपयांपासून ती रक्कम दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. उमेशवर नाशिक येथे शस्त्रक्रिया होत असून ती यशस्वी होईल, त्यासाठी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो. आपण सर्वांनी जी मदत केली, त्या मदतीमुळे आणि तुमच्या आशीर्वादामुळे त्याच्यावरील ही शस्त्रक्रिया नक्कीच यशस्वी होईल. कारण, आपण सर्वांनी निर्मळ मनाने हे पैसे दिले. म्हणूनच, महाराष्ट्राचा हा खली निश्चितच पुन्हा नव्या दमाने महाराष्ट्रासमोर, पुण्यासमोर उभा राहिलेला दिसेल, असेही वसंत मोरे यांनी म्हटले.

मनसेचे पुण्यातील आमदार रमेश वांजळे हे गोल्डन मॅन म्हणून प्रसिद्ध होते. आपल्या डॅशिंग स्वभावामुळे आणि भारदस्त पर्सनॅलिटीमुळे ते अल्पावधीतच महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. दुर्दैवाने त्यांचं निधन झालं. त्यानंतर, त्यांचे अंगरक्षक उमेश आसवे यांची मोठी तारांबळ उडाली.

अनेकांनी केली ऑनलाईन मदत

तब्बल ७ फूट उंच आणि १६५ किलो वजन असलेले उमेश वसवे महाराष्ट्राचे 'खली' म्हणून प्रसिद्ध होते. धिप्पाड शरीरयष्टी लाभलेले उमेश गेल्या २ वर्षांपासून आजाराशी झगडत आहेत. आता, त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याने त्यांच्या मदतीसाठी वसंत मोरेंनी थेट सोशल मीडियातून आवाहन केलं आहे. त्यानंतर, दिवंगत आमदार वांजळे यांच्या चाहत्यांकडून वासवे यांना मदत मिळत आहे. अनेकांनी ऑनलाईन आर्थिक मदत केल्याचे स्क्रीनशॉट्सही वसंत मोरे यांच्या फेसबुक पोस्टखाली कमेंट केले आहेत. वसंत मोरेंच्या आवाहनाला सोशल प्रतिसाद मिळत असल्याने वासवे यांना आर्थिक हातभार लाभत आहे.