आणखी एक गुगली! शरद पवार-आशिष शेलार युती; एमसीए निवडणुकीमुळे सारेच चक्रावले

in #yavtmal2 years ago

मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आगामी निवडणुकीला सोमवारी मोठी कलाटणी मिळाली. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना, या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता असलेले शरद पवार आणि आशिष शेलार गटांनी युती करत सर्वांनाच चक्रावून सोडले. पवार आणि शेलार यांनी चर्चा करून एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. यानंतर, संदीप पाटील गटाने आपल्या गटाचे नाव बदलून ‘मुंबई क्रिकेट ग्रुप’ असे ठेवले.

पवार आणि शेलार यांचे गट एकत्र आल्याने आता निवडणुकीमध्ये शरद पवार-आशिष शेलार असा संयुक्त गट असेल. त्यामुळे आधीच्या शरद पवार गटातील अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांच्यासह इतर उमेदवारांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले होते. यावर पाटील यांच्या गटाने पलटवार करताना आपल्या गटाचे नाव बदलून ‘मुंबई क्रिकेट ग्रुप’ असे ठेवले. यामुळे पवार-शेलार गटापुढे तगडे आव्हान निर्माण झाले आहे.

पवार-शेलार गटामध्ये मिलिंद नार्वेकर आणि जितेंद्र आव्हाड यांचाही समावेश असून, या दोन्ही उमेदवारांनी अपेक्स कौन्सिलपदासाठी अर्ज भरला आहे, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले अमोल काळे यांनी पवार-शेलार गटातून उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे.या आधी एमसीए निवडणुकीसाठी पवार यांनी आपला वेगळा गट जाहीर केला होता, तसेच उमेदवारांनी उमेदवारी अर्जही भरले होते.

मी मुंबई क्रिकेटमुळे घडलोय आणि आता मुंबई क्रिकेटसाठी काम करायचंय. काहीही झालं, तरी मी निवडणूक लढवण्याचे निश्चित केले होते. आमची टीम नावाची नाही, तर कामाची आहे. क्रिकेट केवळ बॅट-चेंडूपुरता मर्यादित नसून, एक खेळाडू घडविण्यामागे अनेक लोक कार्यरत असतात, असे एमसीए अध्यक्षपदाचे उमेदवार संदीप पाटील यांनी सांगितले.

Sort:  

Please like my post mam please like 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏