मान्सूनची वाटचाल मंदावली, स्थिती हळूहळू अनुकूल; पुढील पाच दिवस पूर्व मोसमी पाऊस

in #yavtmal2 years ago

पुणे : मान्सूनच्या प्रगतीसाठी सध्या अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात स्थिती आवश्यक तेवढी अनुकूल नाही. अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकू लागल्यास मान्सूनची वाटचाल जोमाने होऊ शकेल. ही स्थिती हळूहळू तयार होत आहे. त्यामुळे मान्सूनची प्रगती होत आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिली. मान्सूनने सध्या केरळ, कर्नाटकचा ४० टक्के, तर तामिळनाडूचा ७० टक्के प्रदेश व्यापला आहे. सध्या तो कर्नाटकातील कारवार, चिकमंगरूळ, पुदुच्चेरी व बंगालचा उपसागर, ईशान्येकडील सर्व राज्ये सिक्किममधील सिलिगुडी, उपहिमालयन बंगाल असा पसरला आहे. मान्सूनच्या प्रगतीबाबत काश्यपी म्हणाले, ‘दरवर्षी मान्सूनच्या प्रवाहाला गती मिळण्यासाठी वेळ लागतो. यावर्षीही सुरुवातीला अडथळा निर्माण झाला. परंतु, अरबी समुद्रावरील तसेच बंगालच्या उपसागरावरील मान्सूनचा प्रवाह हळूहळू गतिमान होत आहे.’

काेकणात लवकरच हाेणार आगमनराज्यात पुढील पाच ते सात दिवस पूर्व मोसमी पावसाची शक्यता असून, त्यानंतर मान्सूनच्या प्रवाहातही बदल होत जाईल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी परिसरात यात हळूहळू प्रगती होत आहे, असेही काश्यपी यांनी सांगितले.

  • पुढील चार ते पाच दिवस मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. - दक्षिण मध्य महाराष्ट्रात विशेषकरून कोकणाला लागून असलेल्या भागात व घाट परिसरात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. - नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. - मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी व जालना या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. - विदर्भात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.