पाम बीच'वरून थेट सायन-पनवेल महामार्गावर जा, आर्म ब्रिज बांधणार

in #yavtmal2 years ago

कोपरखैरणे, कोपरी, वाशी, तुर्भेकरांना आता पाम बीच रस्तामार्गे थेट सायन-पनवेल महामार्गावर जाता येणार आहे. कारण नवी मुंबई महापालिकेने पाच बीच मार्ग ते सायन-पनवेल महामार्गास जोडण्यासाठी आर्म ब्रिज बांधण्याचे ठरविले आहे. या कामावर अकरा ते साडेअकरा कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता संजय देसाई यांनी लाेकमतला दिली.

हा ब्रिज पूर्ण झाल्यावर सायन-पनवेल महामार्गावर जाण्यासाठी सध्या तुर्भेकरांना मॅफ्कोतील वारणा सर्कल-सानपाडा मार्गे किंवा कोपरखैरणे, कोपरी, वाशीकरांना शिवाजी महाराज चौकातून अभ्युदय बँक सिग्नल मार्गे जो दीड ते दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागतो, तो वाचणार आहे. यासाठी १५ ते २० मिनिटे वेळ लागतो. हा वेळ आणि इंधनावरील खर्च वाचणार आहे. महापालिकेने प्रस्तावित केलेल्या आर्म ब्रिजसाठी सीआरझेड प्राधिकरणाने काही दुरुस्त्या सुचविल्या असून त्यानुसार नवे डिझाईन तयार करून हा आर्म ब्रिज बांधण्यात येणार असल्याचे देसाई म्हणाले.

सध्या सायन-पनवेल महामार्गावरून पाम बिच रस्त्यावर येण्यासाठी वाशी सेक्टर-१७ येथे एक आर्म ब्रिज आहे. मात्र, पाम बिच मार्गावरून सायन-पनेवल महामार्गावर जाण्यासाठी सिडकोने कोणतीही सोय केलेली नाही. सिडकोने केलेली चूक आता महापालिका दुरुस्त करणार आहे. त्यानुसार सेक्टर-१७ मधील नाल्यावरून हा आर्म ब्रिज बांधण्यात येणार आहे. पूर्वी तो बाॅक्स कल्व्हर्ट टाईप पद्धतीचा बांधण्यात येणार होता. परंतु, सीआरझेडच्या मंजुरीसाठी त्याचा प्लान गेल्यानंतर प्राधिकरणाने महापालिकेने प्रस्तावित केलेल्या डिझाईनला हरकत घेतली.

यामुळे वाढला खर्च

बॉक्स बाॅक्स कल्व्हर्ट टाईपऐवजी तो पीलर टाकून बांधावा, जेणेकरून खाडीचा प्रवाह अडणार नाही, वन्यजीवांना अडचण येणार नाही, असा यामागचा हेतू आहे. यामुळे महापालिकेने पूर्वी प्रस्तावित केलेला दहा ते साडेदहा कोटींचा खर्च नव्या डिझाईनमुळे एक कोटींनी वाढून तो आता अकरा ते साडेअकरा कोटी होणार आहे. लवकरच कायदेशीर बाबी पूर्ण करून या आर्म ब्रिजचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.