प्रेरणादायी! परीक्षेत 19 वेळा झाला नापास पण नंतर केला जिद्दीने अभ्यास; आता झाला अधिकारी

in #yavtmal2 years ago

नवी दिल्ली - सध्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल समोर येत आहेत. प्रत्येकाला आपल्या मार्कांची आणि पास-नापास होण्याची चिंता असते. निकालानंतर सर्वजण टॉपर्सबद्दल बोलतात. ते त्यांच्या मार्कशीट शेअर करतात, पण परीक्षेत कमी मार्क्स मिळवणाऱ्या मुलांबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्यामुळेच अनेक वेळा तणावाखाली असलेली मुले टोकाचं पाऊल उचलतात. याच दरम्यान अनेक प्रेरणादायी घटना या पुढे येत असतात. काही लोक परीक्षेत नापास झाले असले तरी आज मोठमोठ्या पदांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

परीक्षेमध्ये वारंवार अपयश आले पण एका तरुणाने हार नाही मानली आपल्या मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. परीक्षेत तब्बल 19 वेळा नापास झाला पण नंतर जिद्दीने अभ्यास केला आणि आता अधिकारी झाल्य़ाची घटना घडली आहे. राजस्थानमधील एका तरुणाने आरएएस (RAS) परीक्षेत 55 वा क्रमांक पटकावला आहे. दलपत सिंह असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरएएस दलपत सिंह हे मोहनलाल सुखाडिया विद्यापीठात अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते एक-दोन नव्हे तर 19 वेळा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नापास झाले.

दहावीत त्यांना कमी मार्क मिळाले होते तर बारावीत दोनदा नापास झाले. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांनी परीक्षा दिली. कॉलेजमध्येही ते अनेकदा नापास झाले. PMT, BSTC, PET, Agriculture Department, STE अशा अनेक परीक्षा दिल्या पण सगळ्यात नापास झाले. याच दरम्यान दलपत सिंह यांचा बालपणीचा मित्र आयएएस झाला. यानंतर त्यांनी आयएएस होण्याचा निर्णयही घेतला. जोरदार तयारी केली आणि आता आरएएस परीक्षा-2008 मध्ये 55 वा क्रमांक मिळवला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.