चेहऱ्याचा वापर करून पॉर्न व्हिडिओ, न्यूड फोटो केले तयार; कर्जाच्या फसवणुकीत 'ती' ठरली बदनामीची

in #yavtmal2 years ago

शिक्षणाच्या ओढीने तिने कॉलेजची फी भरण्यासाठी ऑनलाईन कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून तिच्या वाट्याला बदनामीच आली. ऑनलाईन कर्जाच्या या सायबर चोरट्यांच्या फसवणुकीत आणखी एक तरुणी बदनामीची शिकार ठरली आहे. याप्रकरणी लोहगाव येथील एका २१ वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ११ फेब्रुवारी ते ११ जुलै २०२२ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॉलेज शिक्षण घेत आहेत. त्यांना कॉलेजची फी भरण्यासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरुन कोको अॅप डाऊन लोड केले. सर्व माहिती अपलोड केली. त्यानंतर त्यांना झारखंडवरुन फोन येऊ लागले. त्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे व फोटोतील चेहर्याचा वापर करुन पॉर्न व्हिडिओ, न्यूड फोटो तयार केले. हे फोटो व व्हिडिओ त्यांना पाठवले. ते सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिली. फिर्यादी यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मैत्रिणीला या मार्फ केलेले व्हिडिओ व फोटो पाठवून बदनामी केली. विमानतळ पोलीस तपास करीत आहेत.