राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेआधी मनसेला धक्का बसणार; शिवसेनेकडून तयारी, संजय मोरेंची माहिती

in #yavtmal2 years ago

पुणे- मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांची पुण्यात उद्या (२२ मे) जाहीर सभा होणार आहे. पहिल्यांदा २१ मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचं नदीपात्रात आयोजन करण्यात आलं. पण पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचं नियोजन बदलून आता ती सभा रविवारी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच इथे सकाळी १० वाजता होणार आहे. पुण्यातील राज ठाकरेंच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र याआधीच शिवसेनामनसेला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

पुण्यात मनसेच्या पक्षांतर्गत वाद दिवसेंदिवस समोर येत आहे. याचदरम्यान मनसेचे २० पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत मनसेचे २० पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती पुण्यातील शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिली.

राज ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच शिवसेना मनसेला दणका देण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामाची सर्व स्तरांतून चर्चा आणि कौतुक होत आहे. यामुळेच इतर पक्षातील अनेक जण शिवसेनेत येण्यासाठी इच्छूक आहेत. जे पदाधिकारी शिवसेनेत येत आहेत आम्ही त्यांचे स्वागत करतोय, असं संजय मोरे म्हणाले.

पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं. शिवाजीनगरचे मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क झटापटीत झालं असल्याचं समोर आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चक्क झटापटही झाली.

दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेनेकडून टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. टिझरमध्ये गुढीपाडवा सभा, शिवतीर्थ या सभेत माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाहीय, मात्र तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, असं राज ठाकरेंचं विधान दिसत आहे. तसेच उत्तरसभा, ठाणे या सभेत नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान होतील, ते झाल्यावर त्यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड या राज्याचा विकास करावा, असं राज ठाकरे बोलताना दिसत आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील हनुमान चालीसा पठणाचंही टीझरमध्या दाखविण्यात आलं आहे. त्यानंतर औरंगाबादमधील सभेतील, रस्त्यावर नमाज पठण करण्याचे अधिकार कुणी दिले, असा सवाल राज ठाकरे विचारताना दिसत आहे.