सांगलीतील समर्थ पवार, पलूसची धैर्यशील मदने टोळी तडीपार पोलिस प्रमुखांचा दणका

in #yavtmal2 years ago

शहरासह पलूस परिसरात दरोडा, घरफोडी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल असलेल्या सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समर्थ भारत पवार आणि पलूस येथील धैर्यशील मदने टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी ही कारवाई केली. पवार टोळीस सांगली आणि कोल्हापूर तर मदने टोळीस सांगली आणि सातारा या दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

सांगली शहर परिसरात समर्थ पवार व त्याच्या साथीदारांनी गुन्हेगारी कारवाया सुरु ठेवल्या होत्या. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खंडणीचा प्रयत्न असे विविध गंभीर गुन्हे पोलीस ठाण्यात या सर्वांवर दाखल आहेत. या टोळीतील समर्थ भारत पवार (वय २१), अक्षय सुनील सूर्यवंशी (२०), संतोष अनिल सूर्यवंशी (२५ रा. तिघेही राजीव गांधी झोपडपट्टी, सांगली ), रोहित बाळू सपाटे (२० रा. इंगवले प्लॉट सांगली ) आणि रोहित मधुकर गोसावी (२२ रा. वाल्मीकी आवास, सांगली ) अशी संशयितांची नावे आहेत.पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीत धैर्यशील मदने टोळीविरोधात खुनाचा प्रयत्न, मालमत्तेसाठी मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार धैर्यशील विक्रम मदने (वय २०), रोहन शंकर हुवाळे (२१) आणि अनिकेत रवींद्र लोहार (२२, सर्व रा. रामानंदनगर ता. पलूस) यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली.

दोन्ही टोळ्यांवर कारवाईसाठी प्रस्ताव देण्यात आला होता. त्यास पोलिस अधीक्षक डॉ. तेली यांनी मंजुरी दिली.चौकट

गुन्हेगारांवर नजर

पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून अधीक्षक डॉ. तेली यांनी कारवाई सुरु केली आहे. आता शहरासह पलूसमध्ये गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अशाच गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर आता नजर असणार आहे.