उजनीचे बॅकवॉटर अन् स्मार्ट सोलापूरचे स्टेशन पाहून प्रवाशांनी लुटला निसर्गसौंदर्याचा आनंद

in #yavtmal2 years ago

अनोखे विस्टाडोम डबे... काचेचे छत... रुंद खिडकीचे फलक, एलईडी दिवे, फिरता येण्याजोग्या सीट्स आणि पुशबॅक खुर्च्या, इलेक्ट्रिकली ऑपरेटेड ऑटोमॅटिक स्लाइडिंग कंपार्टमेंट डोअर्स, रुंद बाजूचे सरकते दरवाजे, व्ह्युइंग गॅलरी... अशा एक ना अनेक वैशिष्टांनी परिपूर्ण असलेल्या पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस सोलापूरहून मार्गस्थ झाली. या एक्स्प्रेसमधून आंध्र, कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांनी सोलापूर जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला.

शताब्दीमधील प्रवाशांनी उजनी बॅकवॉटर आणि भिगवणजवळील धरणाचा आनंद घेतला. याच वेळी उजनी बॅकवॉटर परिसरात असलेल्या स्थलांतरित पक्ष्यांचे प्रवाशांना चांगलेच दर्शन झाले. अनेक प्रवाशांनी फोटोमधून प्रत्येक क्षण टिपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रवाशांचे सोलापुरात आगमन होताच रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या मोठमोठ्या इमारती, गिरणीची चिमणी, स्थानकावरील सोलापूरचे दर्शन घडविणारी चित्रे पाहून प्रवासी चांगलेच सुखावले. त्यानंतर पुढे अलमट्टी धरण तसेच विकाराबादजवळील अनंतगिरी टेकड्यांमधून जाताना जंगलातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद प्रवाशांनी घेतला.


असा आहे शताब्दीचा वेळ

पुणे-सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी सहा वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि सोलापुरात १० वाजता पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी २.२० वाजता सिकंदराबादला पोहोचेल. सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस सिकंदराबाद येथून दुपारी २.४५ वाजता (मंगळवार वगळता) सुटेल आणि ७.३० वाजता सोलापुरात पोहोचेल अन् त्याच दिवशी (मंगळवार वगळता) रात्री ११.१० वाजता पुण्यात पोहोचेल.


चारच स्थानकावर आहे थांबा

शताब्दी एक्सप्रेस ही ताशी १२० कि.मी. वेगाने धावणारी गाडी आहे. ती पुण्याहून निघाली की दौंड, सोलापूर अन् गुलबर्गा स्थानकांवर थांबून सिकंदराबादला पोहोचणार आहे. या गाडीचा तिकीट दर जास्त असला तरी प्रवाशांची मोठी मागणी या गाडीसाठी असल्याचे पहिल्या दिवशी दिसून आले.


शताब्दीला चांगला प्रतिसाद, चार महिन्यात ३.९९ कोटींची कमाई

मध्य रेल्वेच्या चार शताब्दी एक्स्प्रेसमधून महिन्याभरात ३१ हजार ८२१ प्रवाशांनी प्रवास केला. एप्रिल ते जुलै २०२२ या कालावधीत रेल्वेला ३.९९ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. शताब्दी एक्स्प्रेसला प्रवाशांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापूरकरही या गाडीतून पुणे व हैदराबादकडे प्रवास करीत आहेत.


सेल्फी अन् मोबाईलवरील स्टेटस

सकाळी १०च्या सुमारास व सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वेस्थानकावर आलेल्या शताब्दी एक्सप्रेसो नवे लुक व आतमधील सीट्स, एलईडी दिवे अन् काचेच्या खिडक्यांनी सोलापूरकरांचे लक्ष वेधले. गाडी स्थानकावर थांबताच सोलापुरातील प्रवाशांनी गाडीसोबत फोटो, सेल्फी काढला अन् मोबाईलवरील स्टेटसवर ठेवला.

Sort:  

Nice sir ji