शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी, शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा, मिलिंद

in #yavatmal2 years ago

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होऊन अनेक दिग्गज नेते हे शिंदेगटामध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हेही उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून शिंदे गट आणि शिवसेनेकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. दरम्यान, स्वत: मिलिंद नार्वेकर यांनी शिंदे गटात जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर एक सूचक ट्विट केलं आहे.

आज सकाळी केलेल्या या ट्विटमध्ये मिलिंद नार्वेकर म्हणतात की, ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या कामाची काल रात्री पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवाला भेट दिली आणि माता दुर्गेचं दर्शन घेतलं.

दरम्यान, उद्धव ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकर शिंदे गटात दाखल होणार असल्याचा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी धुळ्यात केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र याबाबत काहीच माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले होते. मिलिंद नार्वेकर यांचे एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत. शिवसेनेत फूट पाडल्यानंतरही गणेशोत्सवात एकनाथ शिंदे गणपती दर्शनासाठी मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार याबाबत चर्चा तेव्हापासूनच सुरू आहे. पण मिलिंद नार्वेकर कुठेही जाणार नाहीत, असे मला तरी वाटते. उगीच संभ्रम निर्माण करायचा, लोकांमध्ये गैरसमज पसरवायचा हे योग्य नाही, असे शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले होते. सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

milind-narvekar-21212_202210891170.jpg