शिंदे गटाच्या बंडानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंची जाहीर सभा; दसरा मेळाव्याआधी शिवसेनेचा धमाका?

in #yavatmal2 years ago

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या बैठका, दौऱ्यांचे सत्र सुरूच आहे. शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष वाढताना दिसत आहे. यातच शिंदे गटाच्या बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होणार की नाही, यावर अद्याप स्पष्टता नसली तरी, दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केल्याचे सांगितले जात आहे. गेली अनेक वर्ष सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आपल्याच ताब्यात ठेवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. उद्धव ठाकरेंविरुद्ध भाजप, मनसेसह शिंदेगटाचं आव्हान असणार आहे. तेव्हा आपला गड मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे नेस्कोच्या मैदानात उतरणार आहे.

पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या प्रयत्न

एकेकाळी खांद्याला खांदा लावून ठाकरे, शिंदे आणि फडणवीस काम करत होते. पण आता ठाकरे विरुद्ध सारे असे चित्र तयार झाले आहे. गटप्रमुखांचा मेळावा म्हणजे पक्षाला नवसंजीवनी देण्याच्या उद्धव ठाकरेंचा प्रयत्न असेल, असे म्हटले जात आहे. बंडानंतर अनेक कार्यकर्ते, नेते हे शिंदे गटात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मेळावा घेणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. शिवसैनिकापर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. शिंदे सरकारच्या विरोधात एल्गार करुन आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलेय. ही लढाई पुढे घेऊन जायचे काम आता उद्धव ठाकरे करणार असल्याचे सांगितले जात आहे.

uddhav-thackeray-mlc_201806100899.jpg