Nashik : कपालेश्‍वराच्या दर्शनासाठी दूरवर रांगा

in #yavatmal2 years ago

नाशिक : देशातील एकमेव नंदी नसलेला महादेव म्हणून श्री कपालेश्‍वराची महती आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची वर्षभर वर्दळ असते. दुसऱ्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधत भाविकांनी पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांच्या अलोट उत्साहामुळे सायंकाळी या रांगा दूरवर पोचल्या होत्या. (Long queues for Kapaleshwar darshan by devotees Nashik Latest Marathi News)

श्रावणी सोमवार म्हटले भगवान शंकराच्या भक्तांमध्ये उत्साह संचारतो. त्यामुळे बम बम भोलेचा गजर करत भाविक भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. मंदिर प्रशासनाने पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणेच आजही रामकुंडाकडून प्रवेशाचे आयोजन केले होते.

त्यानंतर मुख्य मंदिरातील दक्षिण दरवाजाने प्रवेश, तर उत्तर दरवाजाने बाहेर पडण्याचा मार्ग निश्‍चित करण्यात आला होता. प्रदक्षिणा मार्ग आजही बंदच ठेवण्यात आला होता. भाविकांना बाहेर पडण्यासाठी मंदिराच्या मागील बाजूला व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, आजही अनेक भाविकांकडून खिचडी, केळी, राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात आले. सायंकाळी परिसरातून काढण्यात आलेल्या श्रींच्या पालखी सोहळ्याचेही भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले.
रस्ते बंदीस्त

कपालेश्‍वर महादेव मंदिरालगत म्हणजे रामकुंड परिसर चिंचोळा असल्याने थोड्याशा गर्दीतही या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होते. त्यामुळे पंचवटी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी जानी हाऊस, मालेगाव स्टॅन्ड, कपालेश्‍वर मंदिराची मागील बाजू आदी ठिकाणी रस्ते बंदीस्त करण्यात आले होते. त्यामुळे वाहनधारक व पोलिसांत काहीवेळा वादावादीही होत होती. परंतु, दुचाकीस्वारांची समजूत काढत पोलिसांनी हा प्रश्‍न सामंज्यस्याने सोडविला.

सोमेश्‍वरला दर्शनासाठी रीघ

शहरापासून पाच- सहा किलोमीटर दूरवरील निसर्गाच्या सानिध्यातील सोमेश्‍वर महादेव मंदिरातही भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. देवस्थानतर्फे खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले.

पहाटेच्या काकड आरतीत ट्रस्टचे अध्यक्ष गोकुळ पाटील यांच्यासह सचिव बाळासाहेब लांबे सहभागी झाले होते. दुपारच्या आरतीत आमदार सरोज आहिरे व माजी महापौर दशरथ पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या ठिकाणी खेळणीसह विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले असून त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.