इम्रान खान यांच्या राज्यात अराजक कायम, इस्लामाबादेत लष्कर तैनात

in #yavatmal2 years ago

काश्मिरमधील फुटीरतावादी नेता म्हणून ओळख असणाऱ्या यासिन मलिकला शिक्षा जाहीर झाली आहे. दिल्लीच्या विशेष न्यायालयाने यासंदर्भात निकाल दिला असून यासिनला टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पाकिस्तानात ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात आले आहे. आंदोलक आक्रमक झाले असल्याने राजधानीत खळबळ माजली आहे. परिणामी, इम्रान खान यांच्या राज्यात अराजक कायम असून इस्लामाबादेत लष्कर तैनात करण्यात आले आहे.इम्रान खान यांचा लाँग मार्च हा इस्लामाबादमध्ये दाखल झाला आहे. मात्र, तो राजधानीत दाखल होण्यापूर्वीच येथील हिंसाचाराने रौद्र रुप धारण केले आहे. इस्लामाबादमधील चायना चौक मेट्रो स्टेशन येथे पोलिसांशी झालेल्या चकमकीत आंदोलकांनी जाळपोळ केली आहे. येथील चायना चौक मेट्रो स्टेशनला आग लावण्यात आली असल्याने खळबळ पसरली आहे.या घटनेमुळे पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमधील परिस्थिती हाताळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आणि लष्कराकडून आंदोलकांना माघारी पाठवले जात आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला असून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतरही परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र नाही. त्याचबरोबर इस्लामाबादमधील रेड झोनच्या सुरक्षेसाठी सरकारने लष्कराला पाचारण केले आहे. रेड झोन हे पाकिस्तान सरकार, न्यायपालिका आणि विधिमंडळ भवन यांच्याशी संबंधित विभाग असलेले क्षेत्र आहे.