मुंबई, ठाण्यासह कोकणात आजपासून जोरधारांचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्र,

in #yavatmal2 years ago

पुणे : मोसमी पाऊस दाखल होऊनही तो गायब असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच कोकण विभागात पाऊस हळूहळू जोर धरत आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावतो आहे. पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण कोकण विभागासह मुंबई, ठाणे परिसरात काही भागांत जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.मोसमी पावसाने सध्या महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला आहे. पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर तेथे बहुतांश भागात अतिवृष्टी होत आहे. पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोसमी पावसाच्या अरबी समुद्रातील बाजूला मात्र बहुतांश भाग पावसाविना कोरडा असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सध्या अरबी समुद्रातून काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टी आणि प्रामुख्याने दक्षिण कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आदी जिल्ह्यांसह मुंबई आणि परिसरात काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे.