विदर्भात यवतमाळ गरीब तर, नंदुरबारमध्ये स्थिती बिकट

in #yavatmal2 years ago

शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा विदर्भात सर्वाधिक गरीब असल्याची माहिती नीती आयोगाच्या अहवालातून पुढे आली आहे. राज्याच्या यादीत हा क्रमांक सहावा आहे. वाशीम नवव्या तर गडचिरोली जिल्हा दहाव्या स्थानी आहे. गरिबी निर्मूलनासाठी राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे हे घडून आल्याचा आरोपही यानिमित्ताने होत आहे.

नीती आयोगाने २०११ची जनगणना आणि २०१९-२०मध्ये झालेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणावरून देशभरातील गरिबीचा निर्देशांक जाहीर केला आहे. यात दर्शविण्यात आलेली गरिबी केवळ दरडोई उत्पन्नावर आधारित नाही. तर उपलब्ध घरे, वीज जोडण्या, पाणीव्यवस्था, स्वयंपाकाच्या इंधनाची व्यवस्था, आरोग्यसुविधा, शिक्षणाच्या सोयी, मृत्यूदर अशा विविध निकषांच्या आधारावर हा निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. नीती आयोगाच्या अहवालानुसार मागील दहा वर्षांत 'बीपीएल'मधील नागरिकांची संख्या कमी झालेली नाही. यवतमाळ जिल्ह्याचा निर्देशांत २३.५४ टक्के इतका असल्याने आजही या जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात दारिद्रयरेषेखाली जीवन जगत असल्याचे स्पष्ट होते. याखालोखाल वाशीम, गडचिरोली, गोंदिया, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्याचा क्रमांक लागतो. नागपूर, भंडारा आणि वर्धा जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांचा निर्देशांक दोन आकडी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत शाळा, दवाखाने, घरकुल, पाणीपुरवठा अशा विविध सोयीसुविधांबाबत शासकीय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.93264161.jpg