दिवाळीतही गडगडाट?, परतीच्या पावसाने चिंतेत भर; पाहा हवामान विभागाचा अंदाज

in #yavatmal2 years ago

weather-forecast-94870633.jpgम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास शुक्रवारपासून ( Weather Forecast Maharashtra ) सुरू झाला असून १४ ऑक्टोबरला सुरू झाला आहे. भरुचपर्यंत परतीच्या पावसाने प्रवास केल्यानंतर सुमारे ११ दिवस पुढील प्रवासामध्ये खंड पडला होता. या काळामध्ये गडगडाटासह महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली. या गडगडाटामुळे हा परतीच्या पावसाचा गडगडाट आहे की आता दिवाळीतही पाऊस कायम राहणार, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरातमधील उर्वरित भागांतून आणि मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड येथून मान्सूनने शुक्रवारी माघार घेतली आहे. यासोबतच जळगाव, डहाणू येथूनही मान्सूनने माघार घेतली आहे. येत्या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी भागांमधून मान्सून माघार घेण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. मात्र एकीकडे परतीचा प्रवास सुरू असताना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मुंबईत ठिकठिकाणी गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. मुंबईच्या विविध भागांमध्ये अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी जाहीर केलेल्या पूर्वानुमानानुसार मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता होती. मात्र शुक्रवारी हा इशारा अद्ययावत करून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. दोन दिवस यलो अॅलर्टनंतर पाऊस न पडल्याने मुंबईकरही निश्चिंत होते. मात्र, शुक्रवारी मुसळधार सरींसह मुंबईत पाऊस कोसळला. तासभरानंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला.

संध्याकाळी पाचनंतर पावसाचा जोर वाढला. मात्र सायंकाळी ५.३० पर्यंत कुलाब्यामध्ये शून्य मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सांताक्रूझ येथे १३.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबईत संध्याकाळी पाचनंतर के पूर्व, के पश्चिम, मरोळ, विक्रोळी, विद्याविहार येथे ४० मिलीमीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली. कल्याण-डोंबिवली येथेही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. दिवसभरात राज्यात पुणे येथे ७४.३ तर परभणी येथे ६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याची नोंद होती.