सह्याद्रीचा माथा : धार्मिक उत्सवांमधून व्हावी आनंदाची पेरणी

in #yavatmal2 years ago

आनंदीवृत्तीला तसं काही निमित्त लागत नाही. आनंदी राहणं ही मनाची अवस्था मानली गेली आहे. मात्र, या आनंदी मनोवृत्तीला खतपाणी घालण्याचं, वृद्धिंगत करण्याचं काम आपल्या सण-उत्सवांमधून सातत्यानं होत आलं आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरोघरी गणरायाच्या स्वागताची लगबग दिसून येत आहे.

बुद्धीची, विद्येची देवता गणपतीचं पूजन आपण करतो. गणरायाच्या आगमनापासून पुढे नवरात्र, पितृपक्ष ते दसरा-दिवाळी पर्यंतचा हा काळ संपूर्ण समाजासाठी आनंददायी ठरणारा असतो. या काळात आनंदाची पेरणी करण्यासाठी समाजातील सज्जन शक्तींनी पुढे येण्याची ही वेळ आहे. (sahyadricha matha marathi article by dr rahul ranalkar on religious festivals nashik latest marathi news)

सज्जन शक्तींचा पुढाकार आणि सहभाग महत्त्वाचा असल्याचं कारण म्हणजे सध्याचे सण-उत्सवांचं स्वरुपी बाजारीकरणाकडे झुकणारं दिसून येतं. गणेशोत्सवात ही बाब प्रकर्षानं समोर येते. भारतीय शास्त्र, पुराणांमध्ये नमूद असलेली गणेशाची उपासना, आराधना आणि सध्याचं गणेशोत्सवाचं स्वरुप हे अत्यंत भिन्न आणि विकृतीकरणाकडे झुकताना दिसत.

अगदी पीओपीच्या मूर्तींपासून ते डीजेचा अनावश्यक आणि कर्कश वापरापर्यंत अनेक नकारात्मक आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टींचा उदोउदो सध्या कमालीचा वाढला आहे. त्यात गणेशोत्सवाच्या मूळ संकल्पनेला तडा जात असल्याचे दिसून येते. ज्या संकल्पना शेकडो-हजारो वर्षांपासून आपल्या समाजाने जपून ठेवल्या आहेत, त्यांचं सध्या होत असलेलं विकृतीकरण मन सुन्न करणारं आहे. हे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचं काम सज्जन शक्तीला करावं लागणार आहे.

गणेश मंडळांच्या माध्यमातून सुरू होणारं राजकारण, वर्गणीच्या नावाखाली वसुल केली जाणारी खंडणी, कार्यकर्त्यांच्या आडून पोसली जाणारी गुन्हेगारी या घातक बाबी देखील गेल्या काही वर्षात फोफावल्या आहेत. या गोष्टींना खतपाणी घालणारी मंडळी कुठली आहेत, हे आता सुज्ञ लोकांपासून फारस लपून राहिलेलं नाही.गणेशोत्सवाच्या पाठोपाठ येणारा पितृपक्ष, नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी हे खरंतर आपल्या संस्कृतीची देण लाभलेला कालखंड आहे. पूर्वजांचं स्मरण करण्याचा, त्यांच्या गुणांना अभिवादन करण्याचा कालखंड जगात केवळ आपल्याकडेच पाळला जातो.

या सगळ्या कालखंडात घराघरांमध्ये सकारात्मक आध्यात्मिक ऊर्जेचा संचार असतो. ही ऊर्जा आपल्याला सतत बळ देत असते. विकृतीकडे झुकणाऱ्या सणांच्या बाजारु मनोवृत्तीला वेसण त्यासाठीच घालावं लागणार आहे. ही जबाबदारी आता सज्जन मंडळींना उचलावी लागेल.

सनातन परंपरा असलेला आपला भारत देश हा उत्सवप्रिय देश म्हणून जगात मान्यता पावला आहे. भारतीय संस्कृतीतील सण-उत्सवांच्या परंपरा या खरंतर आनंदाची पेरणी करणाऱ्या आहेत. आपली संस्कृती, परंपरा, शास्त्र आणि नीतीमूल्यांची कास पाश्चात्य देश धरु पाहत आहेत. भारतीय शास्त्रांमधील उपयुक्तता जगानं मान्य केली आहे.

अगदी उदाहरण द्यायचं झालं तर योग, प्राणायाम, ध्यानधारणा यांचं देता येईल. मनोविज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय ऋषीमुनींनी खूप खोलवर विचार करुन ठेवला आहे. योग सूत्रांमध्ये याचा प्रत्यय पदोपदी येतो. आता ही भारतीय मूल्य स्वीकारण्यात आणि त्यांवर आगेकूच करण्यात आपण कमी राहू नये, ही समाज म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी आहे.

Sort:  

😍😍😍😍😍