देशभरातल्या कर्करुग्णांचा अहवाल एका क्लिकवर!

in #yavatmal2 years ago

मुंबई : देशभरातील कर्करुग्णांचा अहवाल आता एका क्लिकवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी कोईटा फाऊंडेशन सामाजिक संस्थेने ‘नॅशनल कॅन्सर ग्रिड’द्वारे डिजिटल ऑन्कोलॉजीसाठी नवीन केंद्राची स्थापना करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतातील एकूण २७० केंद्रे नव्या उपक्रमानुसार जोडली जातील. त्यामुळे रुग्णांचे उपचार सोपे होतील. संपूर्ण भारतातील कर्करोगासंबंधित उपचारांमध्ये सुधारणा आणण्यासाठी नॅशनल कॅन्सर ग्रिड (एनसीजी)ने डिजिटल तंत्रज्ञान आणि अनेक साधनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डिजिटल ऑन्कोलॉजीसाठी कोईटा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कोईटा फाऊंडेशनकडून केंद्रासाठी योगदानही मिळाले आहे. पुढील पाच वर्षे नवीन केंद्र ‘एनसीजी’ला सहकार्य करणार आहे. त्यासंबंधित एक करार टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. आर. ए. बडवे यांनी कोईटा फाऊंडेशनसोबत नुकताच केला.

डिजिटल आरोग्यातील सर्वोत्तम पद्धती, आरोग्य साधनांचा अवलंब, ईएमआर, आरोग्य सेवेच्या अहवालाची देवाणघेवाण आणि विश्लेषणासह अनेक सामान्य तंत्रज्ञान उपक्रमांना चालना देण्यासाठी ‘कोईटा’ मदत करील. अनेक डिजिटल टूलचा वापर करून रुग्णालये, डॉक्टर आणि रुग्णांना जास्तीत जास्त फायदा देण्याचा कोईटा फाऊंडेशनचा प्रयत्न आहे. उपशहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांच्या सोयीस्कर उपचारांसाठी डिजिटल टूलच्या मदतीने टेलिमेडिसीन आणि रिमोट पेशंट मॉनिटरिंग (दूरध्वनीवरून रुग्णांची माहिती घेणे) अशांसारख्या साधनांचा वापर केला जाईल. डिजिटल पद्धतीमुळे रुग्णांचे औषध व्यवस्थापन आणि उपचार मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे सहज सोपे होईल.एनसीजीअंतर्गत कोईटा डिजिटल ऑन्कोलॉजी केंद्र तयार होत असल्याचा आनंद आहे. नवीन केंद्र भारतातील २७० एनसीजी रुग्णालयांमध्ये समन्वय साधण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यातून कर्करोगाचे उपचार आणखी सुलभ व माफक बनवण्यासाठी डिजिटल यंत्राचे मूल्यांकन करणे अधिक सोपे होईल, असे ‘एनसीजी’चे संयोजक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी सांगितले.कोईटा फाऊंडेशनचे संचालक रिजवान कोईटा म्हणाले, की कोईटा फाऊंडेशनने ‘एनसीजी’सोबत केलेल्या करारामुळे कर्करोगावरील उपचार व व्यवस्थापन करणे सोपे होणार आहे. कोईटामुळे एनसीजी रुग्णालये आयुष्यमान भारत डिजिटल मिशनचा फायदा करून घेऊ शकतील.

असे आहे तंत्रज्ञान...

  • एखाद्या रुग्णाला वाराणसीहून मुंबईतील डॉक्टरांचा सल्ला हवा असल्यास त्याचा अहवाल एका क्लिकवर उपलब्ध होईल.
  • संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल होऊनच उपचार घ्यायचे आहेत की नाही अथवा त्याच्या आजाराची तीव्रता किती आहे यादी कल्पना डॉक्टरांना अपलोड झालेल्या अहवालावरून समजण्यास मदत होणार आहे. डॉक्टर संबंधित रुग्णाचे ते आहेत त्या ठिकाणी बसूनही निदान करू शकतील.

कोईटा सेंटर फॉर डिजिटल ऑन्कोलॉजी एक चांगला उपक्रम आहे. त्यातून कर्करोग सेवेत काम करणारी रुग्णालये, आरोग्य सेवा तंत्रज्ञान कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधन संस्थांमध्ये एक नवीन शाखा तयार होईल. त्यामुळे कर्करोगाच्या जनजागृतीपलीकडे जाऊन सकारात्मक परिणाम झालेला दिसेल.