नाशिक : मनोरुग्णाचे हातपाय बांधून अघोरी पूजा

in #yavatmal2 years ago

नाशिक : गंभीरस्वरुपाच्या आजार वैद्यकीय उपचाराने बरे होत असल्याची अनेक उदाहरणे असतानाही, ग्रामीण भागात मात्र अजूनही भगताच्या जादूटोण्यावर विश्‍वास ठेवला जातो. निफाड तालुक्यातील एका मनोरुग्ण युवकाचे हातपाय बांधून अघोरी पूजा करण्याचा प्रयत्न जागरूक नागरिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सजगतेने उधळून लावला. या संदर्भात अंनिसने सदरील युवकावर वैद्यकीय उपचार करण्याची भूमिका घेतली आहे. निफाड तालुक्यातील धानोरे येथील २०-२२ वर्षांचा युवक मनोरुग्ण आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यावर उपचारासाठी त्यास तालुक्यातील शिरवाडे (वाकद) याठिकाणी एका भगताकडे नेले होते. या भगताने मनोरुग्ण युवकाच्या कुटुंबीयांना अघोरी पूजाविधी करण्यासंदर्भात सांगितले. त्यासाठी त्यास गोदावरी नदीमध्ये स्नान केल्यानंतर ती पूजा केली जाणार होती. याचसाठी मंगळवारी मनोरुग्ण युवकाला त्याचे हातपाय बांधून मोरविस येथे आणण्यात आले होते.नदीकाठावर आणण्यात आल्यानंतर सदरचा प्रकार मोरवीस गावकऱ्यांना संशयास्पद वाटला. त्याची माहिती गावचे पोलिस पाटील सोमनाथ पारखे, गोरख कोकाटे व काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. या संदर्भातील माहिती त्यांनी तत्काळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांना दिली. चांदगुडे यांनी मनोरुग्ण युवकाच्या कुटुंबीयांना सदरचा प्रकार जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा असल्याचे सांगितले. तसेच मनोरुग्ण युवकास वैद्यकीय उपचार करण्याबाबत समुपदेशन केले. यावेळी ग्रामस्थांनी सदरील युवकास दोरखंडातून मोकळे केले. तसेच, संबंधित भगतावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली.मनोरुग्ण युवकावर चांगल्या वैद्यकीय उपचाराची गरज आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.- कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीesakal_new__4_.jpg