पारंपरिक पत्रावळीवर पुन्हा पंगत

in #yavatmal2 years ago

शुभांगी पाटील, तुर्भे
विवाह, गृहप्रवेश, भंडारे आदी धार्मिक कार्यक्रमात पळस, माहुली झाडांच्या पानांच्या पारंपरिक पत्रावळींना आजही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांचा खपदेखील वाढतच आहे. काही वर्षांपूर्वी पारंपरिक पत्रावळींवर उठणाऱ्या पंक्तींची जागा स्वस्त व मस्त अशा थर्माकॉल व प्लास्टिकने घेतली होती. मात्र, २०१८ मध्ये राज्यात प्लास्टिक व थर्माकॉलवर सरकारने बंदी घातल्यानंतर नवी मुंबईसह पनवेल शहरात पुन्हा पारंपरिक व आरोग्यवर्धक अशा पारंपरिक पत्रावळीवर जेवणावळी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे प्लास्टिक बंदीमुळे काळाच्या ओघात मागे पडलेल्या पळसाच्या पानांच्या पत्रावळीला आता पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे.


एकेकाळी लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी जेवणावळीचा कार्यक्रम पत्रावळीवरच व्हायचा. कालांतराने यामध्ये बदल होत त्याची जागा प्लास्टिक व थर्मोकॉलच्या ताट-वाटीने घेतली. त्यामुळे पारंपरिक पत्रावळी अडगळीत गेली. यातही पुन्हा बदल होऊन जेवणावळीसाठी प्लास्टिक प्लेटचा वापर करण्यात येऊ लागला. काही ठिकाणी तर समारंभातच नव्हे, तर अगदी रोजच्या जेवणातही या पत्रावळीचा वापर होऊ लागला. काही वर्षांतच पारंपरिक पत्रावळींची जागा थर्माकोल व प्लास्टिकने घेतल्याने पत्रावळी बनवणाऱ्या गृहउद्योग व हस्तउद्योगावर उदरनिर्वाह करणाऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले होते. पारंपरिक पत्रावळी इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असतानाच सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. प्लास्टिक आणि थर्माकॉलपासून तयार केलेल्या पत्रावळ्यांचे नैसर्गिक विघटन होत नाही. किंबहुना प्रदूषणामध्ये जास्त वाढ होते. पारंपरिक पत्रावळीमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नाही, उलट त्याचा आरोग्यासाठी अफाट फायदा होत असतो. त्यामुळे काळाच्या ओघात गेलेल्या पत्रवळींवर पुन्हा पंगती उठू लागल्या. यासाठी पत्रावळींच्या मागणीत वाढ झाली आहे.आयुर्वेदिक महत्त्व
पळस, बदाम किंवा माहुलीच्या झाडांच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याचे सांगितले जाते. पुरातन काळापासून जेवणावळींत पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळस व बदामाच्या पानांत आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाची पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. विशेष म्हणजे पळसाच्या पानांना कीडही लागत नाही. याशिवाय अनेक धार्मिक कार्यांमध्ये पत्रावळी आवश्यक असते.नागरिकांचा कल
पळस, माहुली व सुपारीच्या पानांचा वापर करून बनवलेल्या पत्रावळी, द्रोण, सिल्व्हर कोटिंग द्रोण, चमचे, चिवडा डिश अशा वस्तुंना पुन्हा मागणी वाढली आहे. या वस्तूंपासून प्रदूषण व आरोग्याला अपायकारक नसल्याने नागरिकांचा कल हा पारंपरिक वस्तू वापरण्याकडे वाढला आहे.