चंद्रपूर : गोटमारीत २९० जण जखमी

in #yavatmal2 years ago

वरुड (जि. चंद्रपूर) : पांढूर्णा ते सावरगावदरम्यानच्या जाम नदीत परंपरेप्रमाणे गोटमार साजरी करण्यात आली. पांढूर्णा संघाच्या खेळाडूंनी माता चंडिकेच्या दरबारात विजयी ध्वज अर्पण करून जत्रेची सांगता केली. दिवसभर सुरू असलेल्या गोटमारीत २९० जण जखमी झाले. ज्यामध्ये १६ गंभीर जखमींवर स्थानिक शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तीन अतिगंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना करण्यात आले. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशातील पांढूर्णा येथे ऐतिहासिक अशी गोटमार केली जाते. पोळ्याच्या दिवशी जंगलातून पळसाचे झाड आणले जाते. सोबतच एक झेंडासुद्धा लावला जातो. रात्रभर भजनपूजन करून पहाटे तीन ते चार वाजतादरम्यान हा झेंडा पांढूर्णा आणि सावरगावच्या मध्यावर असलेल्या जाम नदीपात्रात रोवला जातो.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी पांढूर्णा आणि सावरगावचे नागरिक एकमेकांवर गोटमार करतात. या गोटमारीदरम्यान पांढूर्णा येथील हा झेंडा नदीपात्रातून उचलून नेतात. त्यानंतर मोठ्या गाजावाजात तो झेंडा चंडिकामातेच्या मंदिरात नेला जातो. ही गोटमार केव्हा सुरू झाली याबाबत कुठेही नोंद नाही. शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा असल्याचे सांगण्यात येते. दोनशेहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि ८०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. गंभीर जखमी खेळाडूंना तातडीने उपचारासाठी नेण्यासाठी १२ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. याशिवाय जिल्हाधिकारी सौरभ सुमन, एसपी विवेक अग्रवाल व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रेतील कामकाजावर लक्ष ठेवले. नदीत पाणी जास्त असल्याने गोताखोर आणि बोटीही हजर होत्या. शहरात १८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली.

माँ चंडिकेच्या दरबारात भक्तांनी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुखाची प्रार्थना केली. प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, एएसपी संजीव उईके, उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश सनोडिया, एसडीएम आरआर पांडे, तहसीलदार वीर बहादूर सिंग, सीएमओ आरके इव्हेनाटी, उपविभागीय पोलिस अधिकारी रोहित लाखे, टीआय के. एस. पार्टे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यात्रेची व्यवस्था आणि देखरेख करण्यात गुंतले होते.