मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांचे मोबाइल हिसकावणाऱ्यांना बेड्या

in #yavatmal2 years ago

औरंगाबाद : सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या (मॉर्निंग वॉक) महिला, पुरुष नागरिकांना लक्ष्य करत तोंडाला रुमाल बांधून मोबाइल हिसकावण्याच्या घटना शहर परिसरात समोर आल्या होत्या. तपासादरम्यान मुकुंदवाडी पोलिसांनी मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दोघांपैकी एका परप्रांतीय संशयित आरोपीला थेट सातारा जिल्ह्यात जाऊन मुकुंदवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

विजय विनोद आघाम (२४) आणि अमित ऊर्फ बबुवा रामनयन चौधरी (२२, रा. दोघेही रा. जगताप शाळेजवळ, राजनगर, मुकुंदवाडी) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यापैकी संशयित विजयला १७ ऑगस्टला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. संशयितांकडून पोलिसांनी एका मोबाइलसह दुचाकी असा ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एन-२ परिसरातील महिला सुरेखा बोरडे या सात एप्रिल रोजी ठाकरेनगर रस्त्याने पायी फिरत होत्या, तसेच अनिल मानकर (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, पुणे) हे पहाटे सिडको स्थानकावर उतरून पाहुण्यांकडे जयभवानीनगरकडे जाण्यासाठी रस्त्यावर आले आणि त्यांनी फोनवर पत्ता विचारत असतानाच आरोपींनी त्यांचा मोबाइल हिसकावला होता. तसेच सुरेखा यांचाही मोबाईल ठाकरेनगर रस्त्यावर हिसकावला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यातील आरोपीपैकी एकजण जगताप शाळेजवळ मित्राची वाट बघत उभा असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. दरम्यान, विशेष पथकाचे अधिकारी तथा उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांनी पथकासह सदर ठिकाणी धाव घेतली असता पोलिसांना पाहताच आरोपी विजय आघामने पळ काढला, मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता आघामच्या कोठडी २१ ऑगष्टपर्यंत वाढ करण्यात आली. तसेच आरोपी चौधरीला २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.दुसऱ्या आरोपीला साताऱ्यातून अटक

विशेष म्हणजे मोबाइल चोरी प्रकरणातील दुसरा परप्रांतीय आरोपी चौधरी याच्या मदतीने आपण चोरी केल्याची कबुली आघाम याने दिली. मात्र चौधरी हा सापडत नव्हता. त्याचा शोध सुरू असताना त्याने त्याच्या पत्नी, मुलीला औरंगाबादेतच ठेवून स्वतः सातारा जिल्ह्यातील वडूज येथे एका ठेकेदाराकडे फरशी बसविण्याचे काम करत असल्याची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळाली होती. त्याला अटक करण्यासाठी १७ ऑगस्टला रात्री पोलिस सातारा जिल्ह्याकडे रवाना झाले. त्याला वडूज येथून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून एक मोबाईल, एक मोपेड दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई विशेष पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार, बाबासाहेब कांबळे, अंमलदार मनोहर गीते, अनिल थोरे, संतोष भानुसे, गणेश वाघ, श्याम आढे यांच्या पथकाने केली. पुढील तपास उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर करत आहेत.

Sort:  

🙏लाइक करने में सभी का सहयोग करे

इसलिए लेने में न रहे लाइक भी करे🙏