Eknath Shinde : मधल्या काळात बरंच काही घडू शकतं; शिंदेंच्या विधानानं सस्पेन्स आणखी वाढला

in #yavatamal2 years ago

आगामी दसऱ्या मेळावा उद्धव ठाकरे घेणार की एकनाथ शिंदे हे अद्याप स्पष्ट झालेले नसून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार का? या प्रश्नावर उत्तर दिले आहे. त्यांच्या या उत्तरामुळे सस्पेन्स संपण्याऐवजी तो अधिक गडद झाला आहे. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा: याआधी अनेक गड उद्ध्वस्त झालेत; चंद्रशेखर बावनकुळेंचा पवारांना इशारा

शिंदेंना आगामी दसरा मेळाव्याला राज ठाकरेंना बोलवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी जेव्हा शिंदे-भाजपचं सरकार स्थापन होत होते. त्यावेळीदेखील अनेक चर्चांना उत आला होता. त्यात अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या की काहींच्या पोटात गोळा येत होता. त्यामुळे आगामी दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार हीदेखील एक चर्चाच आहे. अद्याप गणपती विसर्जन झालेले नाही. त्यानंतर पितृपक्ष, नवरात्र आणि त्यानंतर दसरा आहे. त्यामुळे आताच कसं काय सगळं सांगणार असे सांगत मधल्या काळात अनेक गोष्टी घडू शकतात असे विधान करत शिंदेंनी राज यांच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

हेही वाचा: Amit Shah : मुंबईवर फक्त भाजपचंच वर्चस्व राहिले पाहिजे; शाहांनी दंड थोपटले

शिंदे-राज भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण

नुकतीच एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थवर जाऊन राज यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचे सांगत राज यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आल्याचं शिंदेंनी सांगितलं होते. तसेच राज ठाकरेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध असल्याचे सांगितले होते. त्यावेळीदेखील दसरा मेळाव्याला कुणाकुणाला आमंत्रण देणार यावर स्थळ, पाहुणे मंडळी आदींबाबत निर्णय घेतला जाईल असे विधान शिंदे गटातील एका आमदाराने केले होते. त्यानंतर आता स्वतः शिंदेंनी राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार का? यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे येत्या काळात जर शिंदेंचा दसरा मेळावा झालाच तर, त्यात कोण कोण उपस्थित राहणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.