वैष्णो देवी भाविकांसाठी लवकरच ‘स्कायवॉक’

in #yavatamal2 years ago

जम्मू : वैष्णो देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती देणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्र प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर आता भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणाऱ्या स्कायवॉक निर्मितीला सुरुवात केली आहे. वैष्णो देवी मंदिराजवळ जानेवारी महिन्यात झालेल्या चेंगराचेंगरी नंतर राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या सूचनेनुसार अशाप्रकारची अप्रिय घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना आखायला सुरुवात केली होती. त्यानुसार रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे या प्रणाली नुसार यात्रेकरूंना दिलेल्या ओळखपत्रात त्यांचा नोंदणी क्रमांक आणि अन्य माहिती एनक्रिप्टेड स्वरूपात असून रेडिओ लहरींच्या माध्यमातून यात्रेकरूंचा ठावठिकाणा शोधणे सोपे होणार आहे.

रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळखपत्र प्रणाली कार्यान्वित केल्यानंतर आता मंदिर व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्कायवॉक निर्मिती केली जात आहे. या वर्ष अखेर हा स्कायवॉक बांधून पूर्ण होणे अपेक्षित आहे. या स्काय वॉकच्या निर्मितीमुळे दर्शनासाठी येणाऱ्या आणि दर्शन घेऊन जाणाऱ्या यात्रेकरूंना स्वतंत्र मार्ग उपलब्ध होणार आहेत. या स्कायवॉकच्या निर्मितीसाठी सुमारे पावणे दहा कोटींहून अधिक खर्च येणार असल्याचे श्री माता वैष्णो देवी मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

वैशिष्ट्ये

स्कायवॉकच्या बाजूला १५० व्यक्तींची क्षमता असणारे दोन अतिथी कक्ष.

दोन्ही अतिथी कक्षांत स्वच्छतागृह असणार.

अतिथी कक्षांत एलईडी टीव्ही

स्कायवॉकवर सेल्फी पॉइंर्ट आणि पाण्याची एटीएम मशिन असणार

ज्येष्ठ नागरिकांना वाटेत बसण्यासाठी बाकडी असणार

असा असेल स्काय वॉक

लांबी : २०० मीटर

रुंदी : २. ५ मीटर

स्टेनलेस स्टीलचे रेलिंग आणि वुडन फ्लोअरिंग

क्षमता : एकावेळी ६०० यात्रेकरूंना ये जा करता येईल