संत्र्याचे भाव गडगडले; बांगलादेशच्या आयात शुल्कवाढीचा निर्यातीवर परिणाम

in #pusad2 years ago

अमरावती : विदर्भातील एकूण संत्री उत्पादनाच्या ३५ टक्के माल आयात करणाऱ्या बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्याने निर्यातीला फटका बसला आहे. परिणामी, यंदा संत्र्याचे भाव गडगडले आहेत. अतिवृष्टीतून वाचलेल्या संत्री बागा फळांनी लगडल्या असल्या तरी निर्यात घटल्याने विदर्भातील संत्री उत्पादक आणि निर्यातदार हवालदिल झाले आहेत. बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करावी, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.

बांगलादेशच्या आयात शुल्कवाढीचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे. निर्यात घटल्याने उत्पादकांना देशातच संत्री विकावी लागतील किंवा त्यांवर प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे दर आणखी पडतील, अशी भीती आहे. विदर्भातील वरुड, मोर्शी, परतवाडा, अचलपूर, चांदूरबाजार, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर या भागांत मोठय़ा प्रमाणात संत्र्याच्या बागा आहेत. विदर्भातील एकूण संत्री उत्पादनाच्या सुमारे ३५ टक्के संत्र्याची निर्यात बांगलादेशमध्ये केली जाते. गेल्या वर्षी विदर्भातून दररोज सुमारे २०० ट्रक संत्री बांगलादेशला निर्यात करण्यात येत होती. एका ट्रकमध्ये साधारणत: २५ ते २७ टन संत्री मावतात. गेल्या वर्षी दोन महिन्यांत सुमारे चार लाख टन संत्री बांगलादेशला निर्यात करण्यात आली होती. मात्र, या वर्षी बांगलादेशने संत्र्यावरील आयात शुल्कात पुन्हा वाढ केली आहे. गेल्या वर्षी प्रतिकिलो ५१ रुपये आयात शुल्क होते. यंदा वाढवून ते ६३ रुपये केले आहे.
निर्यातदार अडचणीत

गेल्या काही वर्षांत बांगलादेशात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्र्याची मागणी वाढली आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे दीड लाख मेट्रिक टन संत्री उत्पादन होते. त्यापैकी सर्वाधिक ७८ हजार मेट्रिक टन संत्री एकटय़ा बांगलादेशला निर्यात केली जातात. मात्र, बांगलादेशने आयात शुल्कात वाढ केल्यामुळे संत्री निर्यातदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बांगलादेशाने केलेल्या आयात शुल्कवाढीमुळे विदर्भातील संत्रा उत्पादकांवर आलेल्या संकटाबाबत केंद्र सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि हा प्रश्न सोडवावा, अशी विनंती मी केली आहे.

oranges.jpg