“भाजपला लोकमान्य टिळक आणि टिळक कुटुंबाला विसर, गरज संपली की...”: नाना पटोले

in #pune2 years ago

image.png
Bypoll Election 2023: संपूर्ण राज्याचे लक्ष पुण्यातील कसबा आणि चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपला ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हायला हवी आहे. मात्र, महाविकास आघाडी पोटनिवडणूक लढण्यावर ठाम आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आले आहेत. तरीही भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

भाजपची शक्तिप्रदर्शन करत निघालेली यात्रा टिळक वाड्यासमोरून गेली. त्यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमान्य टिळक यांच्यासह मुक्ता टिळक यांना अभिवादन केले नाही. इतकेच काय शैलेश टिळकही शक्तिप्रदर्शनात दिसले नाहीत. त्यामुळे भाजपला लोकमान्य टिळक आणि टिळक कुटुंबाला विसर पडला, अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसेच गरज संपली की विसरायचे ही भाजपची सवय आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

आम्ही टिळकांना विसरलो नाही

लोकमान्य टिळक आमचे आदर्श आहेत. आम्ही टिळकांना विसरलो नाही. कॉंग्रेसकडून लोकमान्य टिळक यांच्यासहित मुक्ता टिळक यांना अभिवादन करण्यात आले, असे यावेळी सांगण्यात आले. दुसरीकडे, कसबा पेठ मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे. यामध्ये भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात ही प्रमुख लढत होणार आहे.

दरम्यान, कसब्यातून भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवार दिला नाही. त्यामुळे परंपरेचा मुद्दाच निकाली निघाला आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. कसब्यातून काँग्रेसने उमेदवार देत आहे. पक्षाध्यक्ष म्हणून या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले होते.