SAKAL Special : थंडीने सुकामेव्‍याची बाजारपेठ गरम; शहरात दैनंदिन कोटीच्‍या घरात उलाढाल

in #parbhani2 years ago

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कडाक्‍याची थंडी पडली असून, सायंकाळनंतर संपूर्ण शहर गारठते. अशा या कडाक्‍याच्‍या थंडीत सुकामेव्‍याची बाजारपेठ मात्र गरम झालेली आहे. लाडू बनविण्याच्‍या लगबगीसह सुदृढ आरोग्‍यासाठी सुकामेव्‍याची जोरदार खरेदी होते आहे. यातून शहरात दैनंदिन सुमारे एक कोटी रुपयांपर्यंत उलाढाल या खरेदीतून होत असल्‍याचा व्‍यावसायिकांचा अंदाज आहे. दर स्‍थिर असल्‍याने ग्राहकांना दिलासा मिळाल्‍याचेही सांगितले जाते आहे. (SAKAL Special Dry Fruit Market flourish after Cold daily turnover in crores nashik news)
आरोग्‍याच्‍या दृष्टीने हिवाळ्याचा हंगाम पोषक मानला जातो. अनेक नागरिक या कालावधीत आरोग्‍यवर्धक पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्‍य देत असतात. घराघरांत लाडू बनवताना न्‍याहारीच्‍या वेळी पौष्टिक लाडूंचे सेवन केले जाते. लाडू बनविण्यासह रोज आहारात समावेश करण्यासाठी सुकामेव्‍याची जोरदार खरेदी सध्या होते आहे. प्रतिग्राहक साधारणतः एक ते दीड हजार रुपयांची खरेदी करत असून, यामुळे सुकामेव्‍याच्‍या व्‍यवसायात दैनंदिन सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल होत असल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला आहे. पुढील काही दिवस अशाच स्वरूपात बाजार गरम राहणार असल्‍याचा अंदाजही वर्तविला आहे. दिवाळीच्‍या तुलनेत दरांमध्ये घसरण दिवाळीच्‍या कालावधीत आप्तस्‍वकीय, मित्र- परिवाराला भेट देण्याकरिता सुकामेव्‍याची मागणी वाढलेली होती. या कालावधीत दराने उसळी घेतली होती. दिवाळीच्‍या हंगामाच्‍या तुलनेत सध्या बदाम दहा ते पंधरा टक्‍के, तर काजू पाच ते सात टक्क्यांपर्यंत स्‍वस्‍त झालेले आहेत. किसमिस व अंजीरसह खारीक दरांमध्ये किरकोळ वाढ झालेली आहे.