तरुणांनो, नोकरीच्या बहाण्याने होतेय फसवणूक; अशी घ्या काळजी

in #newupdet2 years ago

43f1b2255e1c15978c8650e985297b50ce68eabd6e2b6aaeda7785ba84f4e1b05.jpgकाही महिन्यांपासून नोकरीसाठी धडपडणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील श्‍वेताने ‘नेक्‍सा जॉब’ नावाच्या संकेतस्थळावर स्वतःविषयीची माहिती भरली. त्यानंतर तिला विविध कारणे सांगून शुल्क भरण्यास सांगण्यात आले. तिने संबंधित संकेतस्थळावर व्यवहार केला, मात्र त्यावेळी चुकीचा ओटीपी, असे दोन-तीन वेळा नोटिफिकेशन आले. त्यानंतर नोकरीच्या आमिषाने अनोळखी व्यक्तींनी श्‍वेताच्या खात्यातील २१ हजार रुपये काढून घेतले. अशा प्रकारे बेरोजगार तरुणांना फोन किंवा ऑनलाइन माध्यमाद्वारे नोकरीचे आमिष दाखवून, त्यांची फसवणूक करण्यात येत आहे. मागील सात महिन्यांत ६३८ तक्रारी दाखल होऊनही त्याच्या तपासाबाबत पोलिस मात्र उदासीन असल्याचे वास्तव आहे.

कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीमध्ये अनेकांच्या हातचे रोजगार गेले. अनेकांच्या व्यवसायाला घरघर लागली. दोन वर्षांनंतर आता विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होऊ लागले. त्यामुळे कोरोनामध्ये नोकरी गमावलेल्या नागरिकांच्या, तरुणांच्या आशाही उंचावल्या. त्यामुळे बेरोजगार तरुणांकडून चांगली नोकरी मिळविण्यासाठी पुन्हा एकदा धडपड सुरु झाली आहे. मात्र, सायबर गुन्हेगार अशा तरुणांची फसवणूक करीत त्यांच्या भावनांशी खेळत आहे.