गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या १६ खलाशांना पाकिस्तानकडून अटक, !

in #news2 years ago

गुजरात राज्यातून समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन बोटींना पाकिस्तानच्या मेरिट टाईम सिक्युरिटी एजन्सीने ताब्यात घेतले असून त्यातील अटक केलेल्या एकूण १६ खलाशी कामगारापैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रॅसी संस्थेचे माजी सचिव जतीन देसाई यांनी दिली.

गुजरात राज्यातील ओखा येथील मत्स्यगंधा व अन्य एक मच्छीमार बोट २३ सप्टेंबर रोजी आपल्या बंदरातून मासेमारी साठी नेहमी प्रमाणे समुद्रात गेल्या होत्या. या दोन्ही बोटी मत्स्यसाठ्यांचा शोध घेत असताना समुद्रात प्रवाहात सोडलेली जाळी आपल्या बोटीत घेत असताना अचानक पाकिस्तानी मेरिटाईम सिक्युरिटी एजन्सीच्या स्पीड बोटींनी भारतीय मच्छीमार बोटींना घेराव घातला आणि त्या दोन्ही बोटीसह १६ खलाशांना पाकिस्तानी सैनिकांनी ताब्यात घेतले. या दोन्ही बोटीत असलेल्या खलाशांपैकी ७ खलाशी हे पालघर जिल्ह्यातील असून अन्य ९ खलाशी हे गुजरात राज्यातील आहेत. मागील अनेक वर्षापासून पाकिस्तान सरकारने कारवाई करीत पकडलेल्या १२०० बोटी ताब्यात असून आजही सुमारे ६०० मच्छीमार त्याच्या ताब्यात आहेत. यापैकी सुमारे २६८ मच्छीमारांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांना पाकिस्तान सरकारने सोडलेले नसल्याचे जतिन देसाई यांनी सांगितले आहे. भारत सरकारने त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले नसल्याने आजही निष्पाप खलाशी कामगार कारागृहात खितपत पडले आहेत.fishing-boat-sea-thailand-1373-475_201905245031.jpg