Monsoon withdraws : मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु; हवामान विभागाची मोठी अपडेट

in #nagpur2 years ago


नवी दिल्ली : भारतातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. हवामान विभागानं ही महत्वाची अपडेट दिली आहे. त्यानुसार दिल्लीतून मॉन्सूननं माघार घेतली असून हळूहळू तो दक्षिण भारताके सरकत जाऊन येत्या काही दिवसात संपूर्ण भारतात माघार घेईल. दरम्यान, ठिकठिकाणी परतीचा पाऊस बरसण्याची शक्यताही आहे. (Monsoon withdraws from Delhi: India Meteorological Department)
गेल्या आठवड्याभरापासून परतीचा पाऊस थांबला होता. त्याला गुरुवारी (ता. २९) पुन्हा चालना मिळाली आहे. दरम्यान, मॉन्सूनने गुरुवारी वायव्य भारतातील आणखीन काही भागातून परतल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पोषक हवामानामुळे मॉन्सूनच्या परतीचा प्रवासाला २० सप्टेंबरला सुरवात झाली होती. त्यावेळी मॉन्सून गुजरात व राजस्थानच्या काही भागातून बाहेर पडला होता. मात्र त्यानंतर मॉन्‍सूनच्या परतीचा प्रवास आठवडाभरापेक्षा अधिक काळासाठी थांबला होता. त्यात यंदा मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेच्या चार दिवस उशिराने आपल्या परतीच्या प्रवासाला सुरवात केली होती.
परतीच्या प्रवासाला सुरवात झाल्यानंतर त्याला पुन्हा ‘ब्रेक’ लागला होता. परंतु गुरुवारी परतीच्या प्रवासाला पुन्हा वेग आला असून मॉन्सून संपूर्ण पंजाब, चंडीगड, दिल्ली तसेच जम्मू काश्‍मीर, हरियाना, हिमाचल प्रदेशसह उत्तर प्रदेशच्या काही भागातून तर राजस्थानच्या आणखीन काही भागातून परतला आहे. दरम्यान मॉन्सूनच्या परतीची सीमा आता जम्मू, उना, चंडीगड, कर्नाल, बागपथ, दिल्ली, अलवार, जोधपूर ते नालियापर्यंत असल्याचे हवामानशास्त्र विभागाने नमूद केले आहे.