मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट

in #mumbai2 years ago

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची भेट घेणार आहे. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची त्यांच्या निवासस्थानी गणेश दर्शनाच्या निमित्ताने भेट घेतली होती. त्यानंतर आज नारायण राणे यांची गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेट घेणार आहेत. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ही भेट होईल.
शिवसेनेत मोठी फूट पाडल्यानंतर आपली बाजू अधिक भक्कम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भेटीगाठी सुरू आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील नेत्यांच्याही भेटीगाठी घेतल्या जात आहेत.नारायण राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कट्टरविरोधक समजले जातात. आगामी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे-राणे भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकनाथ शिंदे आक्रमकपणे व्यूहरचना आखत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या पराभवासाठी भाजपने कंबर कसली आहे. काही ठिकाणी भाजपकडून शिंदे गटाला ताकद पुरवण्यात येणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचा पराभव करण्यासाठी शिंदे-भाजप गटाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत राणे हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. राणे यांची कोकणी मतदारांवर असलेली पकड आणि कार्यकर्त्यांचे महत्त्वाच्या ठिकाणी असलेले जाळे याची मदत शिंदे गटाला होऊ शकते. शिंदे गटाची मुंबईत ताकद मर्यादित असल्याचे चित्र आहे. त्यातून राणे यांची शिंदे यांना मोठी मदत होऊ शकते.
images (8).jpeg