सायफळच्या जि. प. शाळेला शिक्षक द्या हो...; पालक वर्गाचा आर्त टोहो.."

in #mahurnews2 years ago

माहूर, प्रतिनिध
अत्यंत दुर्गम भागात असलेल्या सायफळ येथील पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गांना शिकविण्याची भिस्त केवळ एकाच शिक्षकावर येवून ठेपल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभुमिवर शाळेला शिक्षक द्या हो....म्हणत पालकवर्गाने आक्रमक पवित्रा घेतला असून शाळेला शिक्षक मिळावा यासाठी आंदोलन छेडण्याच्या तयारीत पालकवर्ग असल्याचे दिसून येत आहे.

माहूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या व मुख्य महामार्गापासून दुर असलेल्या मौजे सायफळ येथील जिल्हा परिषदेेेेच्या प्राथमिक शाळत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग असून मागील तीन वर्षापासून दोन शिक्षक तर कालपासून सुरू झालेल्या शैक्षणिक सत्रात एकाची बदली झाल्याने आता मात्र केवळ एकच शिक्षक शिल्लक राहीला आहे. विशेष म्हणजे शाळेत मुले व मुली असे एकूण 70 ते 75 विद्यार्थीसंख्या आहे. असे असताना जिल्हा परिषदच्या या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या एकूण पाच वर्गांना उपलब्ध असलेला एकच शिक्षक शिकवणार तरी कसे..? हा गहन प्रश्न पालकवर्गांना भेडसावत असून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायफळ येथे तातडीने शिक्षकाची नेमनुक करावी अशी मागणी येथील पालकवर्गाकडून गटविकास अधिका-यांसह संबंधित विभागाकडे लेखी निवेदनातून केली आहे....