सभागृहातील गोंधळाने ओम बिर्ला नाराज; बेशिस्तता असेपर्यंत कामकाजापासून दूर

in #maharatlast year

image.png
सत्ताधारी आणि विरोधकांमधील तिढा कायम असल्याने लोकसभेत आजही कामकाज झाले नाही. सभागृहातील गोंधळ आणि खासदारांच्या बेशिस्त वर्तनामुळे नाराज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी कामकाजात सहभागी होण्याचे टाळले.

सभागृहात शिस्त पाळली जात नाही तोपर्यंत कामकाजापासून दूर राहण्याचा पवित्रा लोकसभाध्यक्षांनी घेतला असल्याचे कळते. या घटनाक्रमामुळे बहुचर्चित दिल्ली अध्यादेश विधेयकावर आज लोकसभेत चर्चाच होऊ शकली नाही.लोकसभेमध्ये काल (ता. १) दिल्ली अध्यादेश विधेयक मांडताना झालेल्या गोंधळाच्या वेळी विरोधी पक्षांच्या खासदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली होती. यादरम्यान, काही खासदारांनी लोकसभाध्यक्षांच्या आसानाकडे कागद भिरकावल्याच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या ओम बिर्ला यांनी खासदारांवर कारवाईचा सूचक इशारा दिला होता. अर्थात, याप्रकरणात कारवाई काहीही केली नसली तरी लोकसभाध्यक्षांनी आज कामकाजामध्ये सहभागी होण्याचे टाळून आपली नाराजी सभागृहातील खासदारांना कळविली. ‘जोपर्यंत सभागृहातील बेशिस्त वर्तन थांबत नाही तोपर्यंत अध्यक्षस्थानावर जाणार नसल्याचे ओम बिर्ला यांनी गोंधळी खासदारांना उद्देशून सांगितल्याचे समजते. सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. असे असताना काही खासदारांचे वर्तन सभागृहाच्या परंपरांना हरताळ फासणारे असल्याचेही ओम बिर्ला यांनी फटकारले.राज्यसभेत वन संवर्धन विधेयक मंजूरराज्यसभेमध्ये आज वन संवर्धन (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे देशाच्या सीमावर्ती भागातील शंभर किलोमीटरच्या आतील भागाला संवर्धन कायद्यातून वगळण्यात आले असून त्यामुळे या ठिकाणी प्राणी संग्रहालये, सफारी आणि इको-टुरिझमचे प्रकल्प उभारता येतील. लोकसभेमध्ये २६ जुलै रोजीच हे विधेयक मंजूर करण्यात आले होते.
विधेयकावर चर्चा नाहीत्यापार्श्वभूमीवर सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात आले नव्हते. मणिपूर मुद्दा आणि अविश्वास प्रस्तावावर चर्चेची मागणी यावरून लोकसभेमध्ये सकाळी झालेल्या गोंधळामुळे कामकाज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले.दिल्ली अध्यादेशावरील विधेयकावर चर्चा आणि मंजुरीचे नियोजन लोकसभेच्या आजच्या कार्यक्रम पत्रिकेत असल्याने दुपारी दोनला यावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, पुन्हा सभागृह सुरू होताच सत्ताधारी बाकांवरील भाजप खासदारांनी लोकसभाध्यक्षांच्या नाराजीवरून विरोधकांवर ठपका ठेवत घोषणाबाजी सुरू केली. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच पीठासीन अधिकाऱ्यांनी उद्यापर्यंत लोकसभेचे कामकाज थांबविण्याची घोषणा केली. यामुळे दिल्ली अध्यादेशावरील विधेयकावर चर्चा होऊ शकली नाही.