Chilli crop: अतिपावसातही बहरविले मिरचीचे पीक! वाशिम जिल्ह्यातील दोघा भावंडांची यशोगाथा

देपूळ (वाशिम) : संततधार पावसाने हजारो हेक्टरवरील पिके खरडून गेली. पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले; मात्र अतिपावसातही मिरची, टोमॅटो, सिमला मिरची या पिकांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (Application of modern technology on chilli, tomato, capsicum) करत व सततच्या प्रयत्नातून कोणताही विपरित परिणाम होऊ न देता हे पीक बहरविले. ही किमया साधली आहे वाशिम तालुक्यातील जवळा येथील प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर गवळी व गजानन गवळी या दोघा भावांनी.

यावर्षी जास्त पाऊस झाला, शेतात जादा तण वाढले, पिकावरून धुकं गेलं, पाऊस कमी पडला, त्याला खर्च जादा येत होता, म्हणून यावर्षीचे पीक चांगले आले नाही, अशाच प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळाल्या; मात्र याला दोघेही भाऊ अपवाद ठरले आहेत.

ज्ञानेश्वर गवळी यांच्याकडे २० एकर सिंचनाची सोय असलेली जमीन आहे तर गजानन गवळी यांच्याकडे १५ एकर सिंचन जमीन आहे. दोघेही भाऊ बागायती शेती करतात. यावर्षी त्यांनी एकर एकर हिरवी मिरची व सिमला मिरचीचे पीक घेतले असून, टोमॅटो, वांगी लावली आहेत.

पारंपरिक पिकांवर भर न देता ते नव्याने विकसित मिरचीचे, सिमला मिरची, टोमॅटो, वांगी, कोबी यांचे वाण लावतात. मल्चिंग, ठिबक सिंचन, सेंद्रिय खतासोबतच रासायनिक खते व पेस्टीसाईडचा वापर नियोजित पद्धतीने करतात. ते हायटेक शेती करत आहेत.

अपेक्षित उत्पादन घेण्यासाठी आपल्याला त्या पिकांवर लक्ष केंद्रीत करून त्याच्या पाठोपाठ सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. कृषी उत्पन्न घेताना खर्चाची पर्वा करावी लागत नाही. ती काळी आई आहे, ती आपल्याला समृद्ध करतेच. – ज्ञानेश्वर गवळी, प्रयोगशील शेतकरी, जवळा.