माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर!

in #maharashtra2 years ago (edited)

यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री आणि दिग्रसचे माजी आमदार संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी काल रविवारी अकोल्यात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांची गुप्त भेट घेतली. याआधी मुंबईला त्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. काल खासदार अरविंद सावंतांसोबत प्रवेशासंदर्भात अंतिम बोलणी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीवेळी बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय मालोकार, अकोला जिल्हाप्रमुख गोपाल दातकर उपस्थित होते. आता लवकरच संजय देशमुख 'मातोश्री'वर शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिग्रसचे माजी आमदार राहिलेल्या संजय देशमुख यांना सेनेत घेत शिंदे गटात गेलेल्या संजय राठोडांना शह देण्याचा प्रयत्न सेना नेतृत्वाचा प्रयत्न आहे. संजय देशमुखांची यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, यवतमाळ आणि आर्णी मतदारसंघात मोठी ताकद आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदारसंघाचं राजकारण 1999 पासून कायम दोन 'संजय'भोवती फिरत आहे. यातील एक 'संजय' म्हणजे 'संजय राठोड'. तर दुसरे 'संजय देशमुख. दोघांचीही कारकिर्द सुरू झाली शिवसेनेतून. दोघंही कधीकाळचे कट्टर मित्र. मात्र, आता एकदम कट्टर 'राजकीय शत्रू'. दिग्रसचे आमदार असलेल्या संजय राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश करीत शिवसेनेशी बंडखोरी केली. संजय राठोडांचं बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या फारच जिव्हारी लागल्याचं बोललं जात आहे. यातूनच संजय राठोडांना राजकीय धडा शिकविण्यासाठी सेना नेतृत्वानं आता पावलं टाकायला सुरूवात केली आहे. यातील सेनेचा पहिला 'मोहरा' हे संजय देशमुख असण्याची शक्यता आहे. यातूनच उद्धव ठाकरेंनी आता थेट संजय देशमुखांना शिवसेनेत घेत संजय राठोडांना जेरीस आणण्याची रणनिती आखली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री संजय देशमुख शिवसेनेच्या वाटेवर! मंत्री संजय राठोडांना शह देण्यासाठी सेना नेतृत्वाची रणनिती

संजय देशमुखांनी 1999 ते 2009 असं तब्बल 10 वर्ष दिग्रस मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. विशेष म्हणजे दोन्हीवेळी त्यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, 2009 मध्ये संजय राठोड यांच्याकडून पराभवानंतर संजय देशमुख मतदारसंघाच्या राजकारणात काहीसे 'बॅकफूट'वर आल्याचं चित्र होतं. मात्र, दिग्रसमधील नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ अशा ठिकाणी प्रत्येकदा देशमुखांनी आपली ताकद सिद्ध केली आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत संजय देशमुखांनी संजय राठोडांच्या विरोधात अपक्ष लढत 75 हजार मतदान घेतलं होतं. संजय देशमुखांच्या याच ताकदीला आता बळ देण्याचा विचार सेना नेतृत्वाने केला आहे. यासंदर्भात संजय देशमुखांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार अरविंद सावंतांशी प्रवेशासंदर्भात चर्चा झाली आहे. आता लवकरच संजय देशमुख 'मातोश्री'वर शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
images (25).jpeg