आ. राठोडच्या निवासस्थाना, कार्यालयासमोर पोलिस बंदोबस्त

in #in2 years ago

Sanjay_Rathod.jpg

यवतमाळ- एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेना आमदारांना राज्यभरात शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिवसैनिकांनी काही ठिकाणी अशा आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करुन तोडफोड केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांच्या वतीने आ. संजय राठोड यांच्या टिळकवाडी परिसरातील निवासस्थान आणि अवधुतवाडी परिसरातील संपर्क कार्यालय या दोन्ही ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. बंड पुकारणाऱ्या आमदारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा मतदार संघाचे शिवसेनेचे एकमेव आमदार संजय राठोड हे जाणार की, नाही याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र संजय राठोड हे शुक्रवारी गुवाहाटी येथे जावून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर जिल्ह्यातील शिवसेनेच्या दुसऱ्या नेत्या खा. भावना गवळी यादेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही नेते बंडखोरांच्या गटाकडे गेले असले तरी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून शिवसेनेचे काम सुरू ठेवायचे असा पवित्रा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.