‘हज’च्या नावाने फसवणूक करणारा पोलिसांच्या जाळ्यात

in #fraudster2 years ago

images (55).jpeg

यवतमाळ- ‘टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स’ च्या नावाने बनावट कंपनी स्थापन करून हज यात्रेला नेण्याचे आमिष देऊन भाविकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई नेर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी औरंगाबाद येथील काली मशीद परिसरात केली. मोहम्मद यामीन मोहम्मद यासीन कासीद वय ४५ वर्ष रा. दिग्रस असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो गेल्या चार वर्षांपासून पसार होता. त्याच्या विरोधात नेर, पारवा, महागाव, उमरखेड आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. दिग्रस शहरातील मोहम्मद यामीन मोहम्मद यासीन कासीद याने भाऊ मोहम्मद याह्या मोहम्मद यासीन कासीद, मोहम्मद शकील मोहम्मद यासीन कासीद यांना सोबत घेवून २०१६ मध्ये दिग्रस येथे हमजा हज टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स अशी बनावट कंपनी स्थापन केली. त्यानंतर मुस्लीम समाजातील अनेक भाविकांना त्याने हज यात्रेचे आमिष दिले. शिवाय, एका व्यक्तीला हज येथे जाण्यासाठी दोन लाख ६० हजार रुपयांप्रमाणे मोठ्या प्रमाणात रकमांचीही उचल केली. त्याने नेर, महागाव, उमरखेड, पारवा ठाण्याच्या हद्दीतील मुस्लिम बांधवांची त्याने फसवणूक केली होती. त्यानंतर अनेकांनी त्याच्याकडे हज यात्रेला जाण्यासाठी तगादा लावला. मात्र, तो आणि त्याचे भाऊ उडवाउडवीची उत्तरे देत भाविकांना वाटेला लावत होते. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित चारही पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले होते. इमरान खान उस्मान खान रा. पठाणपूरा, नेर यांचीही त्या तिघा भावांनी अशीच पाच लाख २० हजाराने फसवणूक केली होती. त्यानंतर त्यांनी दि. २३ ऑगस्ट २०१८ ला नेर पोलिसात तक्रार दिली होती.