मेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ पोहोचले ठाण्यात

in #amravtilast year

image.png
मेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ चक्क पोलीस ठाण्यात पोहोचले. तो वाद तेथे शमला नाही. घटनेच्या आठवडाभरानंतर मेडिकल असोशिएशनच्या अध्यक्षांसह तब्बल २८ पेक्षा अधिक मेडिकल संचालकांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १ जून रोजी उघड झालेल्या या वॉरमुळे मेडिकल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमोल सार्वे (४५, मायानगर) यांनी तक्रार नोंदविली. अन्य मेडिकलच्या तुलनेत जेनरिक व कंपनीचे थेट आऊटलेट अधिक डिस्काऊंट देते, त्यातून हा वाद निर्माण झाला.

तक्रारकर्ते अमोल सार्वे हे एका मेडिकल कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. त्या कंपनीचे शहरात पाच मेडिकल शॉप आहेत. ते ग्राहकांना एमआरपीपेक्षा २० ते २७ टक्के डिस्काउन्ट देत औषधविक्री करतात. आमच्या त्या ‘विथ डिस्काऊंट’ विक्रीला अमरावतीच्या काही मेडिकलधारकांचा नेहमी विरोध असतो, आम्ही डिस्काऊंट देऊ नये, अशी त्यांची भूमिका असल्याचे सार्वे यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान २३ मे रोजी अमरावती केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ मालानी व अन्य २७ पेक्षा अधिक जण त्या कंपनीच्या साईनगर, शिलांगण रोड, नवाथे नगर, रविनगर व गणेश कॉलनी येथील मेडिकल शाखेत गेल्याचा आरोप आहे.

मालानी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या कंपनीच्या मेडिकलमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांना धमकावले. काचेवरील व शॉपच्या आतील डिस्काऊन्टचे बॅनर व स्टिकर फाडले. ग्लोसाईन बोर्डवर वायर तोडले. दुकानात अनधिकृतपणे शिरून काऊंटरवरील बिल व कागदपत्रे हुसकविले. त्यांनी व्हिडीओ शुटिंग देखील केली. या सर्व प्रकाराचा ग्राहक व कर्मचाऱ्यांना नाहक त्रास झाला. यात सुमारे ८० हजारांचे नुकसान झाल्याचे सार्वे यांनी म्हटले आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

सौरभ मालानी, प्रवीण देशमुख, संजय बोबडे, राजा नानवाणी, मनोज डफळे, योगेश देशमुख, अंकुश अग्रवाल, सागर आडे, संजय नानवाणी, दिप नाथाणी, आनंद अग्रवाल, हरिश लढ्ढा, सारंग सर्यवंशी, कौशल सारडा, अनिल टाले, गोविंद केला, पंकज डाफ, सचिन रहाटे, अक्षय ढोरे, विक्की खेरडे, श्रीेकांत नवाथे, प्रफुल देऊळकर, सौरभ केवळे, शैलेश सोनटक्के, अनुराग मालानी, अमित तापडिया, जय छाबडिया.

आम्हालाही व्यापार करायचा आहे. ते डिस्काऊंट फलक लावून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. जिल्हयातील दोन हजार कुटुंबाचा प्रश्न आहे. ती फलके काढण्याची विनंती केली होती.

  • सौरभ मालाणी, अध्यक्ष, अमरावती केमिस्ट असोसिएशन