Russia Ukraine War : युक्रेनमधील शाळांत पुन्हा किलबिलाट

in #all2 years ago

Russia Ukraine War : युक्रेनमधील शाळांत पुन्हा किलबिलाट
Published on : 2 September 2022, 2:12 am

By
सकाळ वृत्तसेवा

किव्ह : रशियाने हल्ला केल्यामुळे मागील सहा महिन्यांपासून बंद असलेल्या युक्रेनमधील शाळांमध्ये आज पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकू आला. रशियाकडून अद्यापही हल्ल्याचा धोका असताना निम्म्याहून अधिक शाळांनी आपले कामकाज सुरु केले. मात्र, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांकडे मित्र-मैत्रिणींना सांगण्यासाठी सुटीतील गमतीजमती नव्हत्या, तर आपण कसे लपून बसलो, बाँबचे किती आवाज ऐकू आले, याचीच माहिती होती. रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ले सुरु केले, त्याआधीचा दिवस हा येथील शाळांचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे या देशातील चाळीस लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले होते. त्यानंतर आज सहा महिन्यांनंतर युक्रेनमधील सुमारे ५१ टक्के शाळा सुरु झाल्या. सुरु होऊ न शकलेल्या अनेक शाळा बाँबहल्ल्यात उद्ध्वस्त झाल्या आहेत. सुरु झालेल्या शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचाही पर्याय विद्यार्थ्यांना खुला ठेवला आहे. आज शाळांमध्ये फुग्यांची सजावट करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात होते. विद्यार्थ्यांच्या हातात फुलांचे गुच्छही दिले जात होते. विद्यार्थ्यांनी शाळेत खेळण्याचाही आनंद लुटला.