कुकडी प्रकल्पातील पाच धरणांमध्ये ५.७६ टीएमसी पाणीसाठा वाढला

in #yavtmal2 years ago

नारायणगाव : उत्तर पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पांतर्गत जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी चांगली वाढली असून, धरणांमध्ये पाच दिवसात ५.७६ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. आज धरणांमध्ये १७.७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांचा पाणीसाठा वाढेल की नाही, अशी चिंता होती. ६ जुलैअखेर सर्व धरणांमध्ये केवळ ३३७ दलघफू पाणीसाठा उपलब्ध झाला होता. दोन ते तीन दिवस सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व धरणांमध्ये ५७६७ दलघफू पाणीसाठा वाढला आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या पाच धरणांमध्ये गेल्यावर्षीचा ५२६८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. येडगाव धरणात १०९२ दलघफू (३०.४८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जूनपासून २७३ मि.मी. पाऊस असून, २४ तासात ४८ मि.मी. पाऊस झाला आहे. माणिकडोह धरणात २८४२ दलघफू (२१.०४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून ५१६ मि.मी. पाऊस झाला असून, २४ तासात ११६ मि.मी. पाऊस झाला आहे.

वडज धरणात ७३९ दलघफू (२३.९१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जूनपासून २२९ मि.मी. पाऊस झाला असून, २४ तासात ४९ मि.मी. पाऊस झाला आहे. पिंपळगाव जोगा धरणातून मृतसाठा वापरल्याने या धरणात ४१८८ दलघफू (वजा -५.९७ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जूनपासून ४७५ मि. मी. पाऊस असून २४ तासात पाऊस ९७ मि.मी. पाऊस झाला आहे. डिंभा धरणात २७६६ दलघफू (१४.१४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जूनपासून ३६५ मि.मी. पाऊस असून २४ तासात ४२ मि.मी. पाऊस झाला आहे.

चिल्हेवाडी धरणात ६०७ दलघफू (६४.३९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जूनपासून २१८ मि.मी. पाऊस असून २४ तासात ४३ मि.मी. पाऊस झाला आहे. घोड प्रकल्प धरणात १५०० दलघफू (८.०९ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि. १ जूनपासून ९१ मि.मी. पाऊस असून, २४ तासात ५ मि. मी. पाऊस झाला आहे. विसापूर धरणात १६४ दलघफू (१८.२१ टक्के) पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१ जूनपासून ४१ मि.मी. पाऊस असून २४ तासात ४ मि.मी. पाऊस झाला आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली.