महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे यांचे स्थान काय?

in #yavtmal2 years ago

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स‌ंस्थापक राज ठाकरे यांनी बऱ्याच दिवसांतून काही महिन्यांपूर्वी मुंबईत जाहीर सभा घेतली आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही लक्ष्य बनविण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले होते की, कधी तरी घराच्या बाहेर येऊन टीकाटिप्पणी करून पुन्हा घरी जाऊन बसतात. त्यांची नोंद कशासाठी घ्यायची? तशीच आज, रविवारी सकाळी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. मध्यंतरीच्या काळात ठाण्यातही सभा झाली होती. त्यांच्या सभेचा तो उत्तम इव्हेंट असतो. सभेला अमाप गर्दी पण लोटते. चॅनेलवाले संपूर्ण सभा लाईव्ह दाखवितात. सारा महाराष्ट्र ऐकतो. याविषयी वादच नाही. त्यांची वक्तृत्व शैली आणि जोरदार टोलेबाजीमुळे जुन्या जमान्यातील वादळी नेतृत्वांच्या नेत्यांच्या सभासारखी सभा गाजते. सभा संपल्यानंतर त्यांनी मांडलेल्या भूमिकेचे मूल्यमापन केले तर हाती काहीच लागत नाही. विद्यमान महाराष्ट्राच्या वाटचालीवरचे प्रश्न कोणते आणि त्यावर राज ठाकरे यांची राजकीय भूमिका कोणती? लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणते आणि त्यावर मनसेची राजकीय भूमिका अन‌् कार्यक्रम कोणता? याचा थांगपत्ता नसतो. एकूणच काय तर सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात मनसेचे स्थान काय? पर्यायाने एकमुखी नेतृत्व असलेल्या राज ठाकरे यांचेच स्थान काय आहे? असा सवाल उपस्थित होतो.