Nashik Rain: नाशिकला पावसाने झोडपले; एका तासात 27 मिमी पावसाची नोंद

in #yavatamal2 years ago

मागच्या काही दिवसांपासून थांबलेल्या पावसाने नाशिकला रात्री अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यामुळे एका तासात नाशिकमध्ये २७ मिमी पावसाची विक्रमी नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आज हवामान विभागाने काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मागच्या आठवड्यापासून तोंड दडून बसलेला पाऊस आता पुन्हा बरसणार आहे.काल नाशिकमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होतं पण सायंकाळी शहरातील विविध ठिकाणी जोरदार पासाला सुरूवात झाली होती. शहरातील गंगापूर रोड, मुंबई नाका, पाथर्डी फाटा अशा ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने एका तासातच २७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर आजही नाशिकमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत.आज दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. गेल्या दहा ते १२ दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे.हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.