झाेपेच्या गोळ्यांच्या विक्रीप्रकरणी एकाच्या कोठडीत वाढ; आणखी काही विक्रेत्यांची नावे उलगडणार

in #yavatmal2 years ago

झाेपेच्या ३५० गाेळ्यासह एका युवकाला लातूर पाेलिसांनी पकडले होते. दरम्यान त्याला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा गुरुवारी दुपारी त्यास हजर केले असता, न्यायालयाने कोठडीत आणखी वाढ केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात सध्याला झाेपेच्या गाेळ्या काही मेडिकलवर, पानटपरीवरुन विक्री हाेत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पाेलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शिवाजीनगर पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक प्रविण राठाेड यांनी सुतमील राेड परिसरात चाकूर तालुक्यातील दापक्याळ येथील सुमित संताेष कासले (वय २२) या युवकाला सापळा रचून पकडले. ताे झाेपेच्या गाेळ्या विक्री करत असल्याचे आढळून आले. दरम्यान, त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला लातूर येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कोठडीत पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत लातुरातील काही मेडिकल दुकानदाराची नावे सांगितली. याच माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने आणि लातूर जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा आणि गुरुवारी काही मेडिकल दुकानावर धाडी टाकल्या. आता अन्न व औषध प्रशासन विभागाचा अहवाल प्राप्त झाला की, दोषींविरोधात थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असे सहायक पोलिस उपनिरीक्षक दयानंद पाटील म्हणाले. ताब्यात असलेल्या सुमित संताेष कासले याला गुरुवारी पुन्हा लातूर न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

jail-doors_20180478334 (1).jpg