विजयदुर्ग किल्ल्या शेजारी आरमार संग्रहालय उभारा!, प्रमोद जठारांची मंत्री

in #yavatmal2 years ago

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ला हा राजा भोजांनी आठशे वर्षापुर्वी बांधला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गे येणाऱ्या फ्रेंच, पोर्तुगीज सिद्धी जोहर व इंग्रजांचे आक्रमण थोपवण्यासाठी सुसज्ज आरमाराचे बांधकाम याच किल्ल्याच्या परीसरातील समुद्रात सुरू केले. त्यामुळे हा इतिहास पुढील पिढीच्या कायम लक्षात रहावा यासाठी विजयदुर्ग किल्ल्या शेजारी आरमार संग्रहालय उभारा अशी मागणी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे सांस्कृतिक व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.या निवेदनात म्हटले आहे की, शिवरायांच्या आरमाराचे नेतृत्व सरखेल कान्होजी आंग्रे करीत होते. जहाज बांधणी सोबत महाराजांनी या समुद्रात संरक्षण भिंत सुद्धा बांधली. परकीय आक्रमकांपासून महाराष्ट्राचे संरक्षण केले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ सप्टेंबर २०२२ रोजी भारतीय नौसेनेच्या झालेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख 'भारतीय आरमाराचे जनक' असा करून त्यांच्या राजमुद्रेचा समावेश भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये केला. हा सर्व इतिहास आपल्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात आरमाराचे संग्रहालय निर्माण करून व्हावे.या संग्रहालयासाठी विजयदुर्ग किल्ल्या शेजारील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा असुन तेथे असलेले विश्रामगृह सध्या उपयोगात नसल्याने त्या जागेत हे आरमार संग्रहालय अत्याधुनिक पद्धतीने व्हावे. राष्ट्र निर्मितीच्या या कार्यासाठी लागणाऱ्या १० कोटी रूपयांच्या निधीची तरतुद आपल्या सांस्कृतीक मंत्रालयाकडुन करावी व त्या संबंधीची बैठक आपल्या दालनात लावावी अशी मागणी प्रमोद जठार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही दिली आहे.

sudhir-mungdivars_202209890269.jpg